नाणीज,
Narendra Maharaj's appeal नाणीज येथील दक्षिण पीठ रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी हिंदू समाजाच्या लोकसंख्याविषयी चिंता व्यक्त करताना मोठे विधान केले आहे. जगात अनेक ख्रिश्चन व मुस्लीम राष्ट्रे अस्तित्वात आहेत, तर मग किमान एक हिंदू राष्ट्र असावे, असे ते म्हणाले. त्या दिशेने पावले टाकायची असतील, तर हिंदू समाजाने अपत्यसंख्येबाबतची धारणा बदलून अधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंदूंना किमान दोन मुलांचा जन्म देण्याचे आवाहन केले.
नरेंद्र महाराज म्हणाले की, हिंदू समाजामध्ये ‘आम्ही दोघे आणि आमचं एक’ ही पद्धत वाढल्याने लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. तुम्ही आमचे दोन आणि तुमची दोन मुलं असली पाहिजेत, तेव्हाच हिंदू धर्म टिकून राहू शकतो. एका अपत्यावर थांबणे ही मोठी चूक आहे. हिंदूंची संख्या कमी होत असताना मुस्लिम समाजाची संख्या वाढत आहे. लोकशाहीत व्होटबँक अत्यंत महत्त्वाची असते, त्यावर राजकीय निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे देशात हिंदूंची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
हिंदूंनी एकत्र येऊन देश, देव आणि धर्मासाठी काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आमच्यासारखे धर्मगुरु सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्कृती आणि अध्यात्माबद्दल बोलताना नरेंद्र महाराजांनी पुरोगामी प्रवाहावरही टीका केली. आपल्या संस्कृतीचे महत्त्व न कळल्याने पुरोगामित्वाच्या नावाखाली धिंगाणा घातला जातो. अध्यात्मातील वैज्ञानिकता आणि सामाजिकता समजली नाही, म्हणून समाज दिशाहीन झाला आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनःशांती देऊ शकत नाही; ती फक्त अध्यात्म देऊ शकते,” असे ते म्हणाले. पाश्चिमात्य संस्कृती अंधानुकरण करणे ही दुर्बुद्धी असल्याचे सांगत त्यांनी भारत हा जगातील एकमेव देश आहे, जो आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून जगाला मनःशांती देऊ शकतो, असे मतही व्यक्त केले.