मुंबई,
pankaja munde pa anant garje डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांना वरळी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. रात्री साधारण एक वाजता करण्यात आलेल्या या कारवाईनंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पत्नी गौरी गर्जेवर शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप अनंत गर्जेवर ठेवण्यात आला असून, त्याच्यासोबत नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल आहे.
गौरीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच अनंतवर गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी केली होती. आत्महत्येच्या काही दिवस आधी गौरीला अनंतच्या पूर्वीच्या पत्नीचे गर्भवती असल्याची कागदपत्रे मिळाल्याने ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. ही कागदपत्रे तिने स्वतःच तिच्या माहेरच्या लोकांना पाठवली असल्याचा उल्लेख तिच्या वडिलांच्या जबाबामध्ये करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बीएनएस कलम १०८, ८५, ३५२, ३५१(२) अंतर्गत तिघांवर गुन्हा नोंदवला होता.
गौरी आणि अनंत गर्जे यांचा केवळ नऊ महिन्यांपूर्वी थाटात विवाह झाला होता. बीडमधील रहिवासी असलेल्या गौरीचा विवाह सोहळा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला होता. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद वाढू लागले. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे गौरी प्रचंड तणावात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. शनिवारी वरळीतील राहत्या घरात गौरीने गळफास लावून आत्महत्या केली आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेत तिच्या वडिल अशोक पालवे यांनी तक्रार नोंदवली. ते वैद्यकीय योग शिक्षक असून तिची आई परिचारिका आहे.
बी.डी.एस. पदवी पूर्ण केल्यावर गौरीने मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डेन्टल असिस्टंट म्हणून काम सुरू केले आणि नंतर सायन हॉस्पिटलमध्ये डेन्टल सर्जन म्हणून कार्यरत होती. लग्नानंतर दोघेही मुंबईत नोकरीमुळे स्थायिक झाले होते. मात्र, किरकोळ कारणांवरून सुरू झालेल्या वादांचे रूपांतर गंभीर तणावात झाले आणि अखेरीस गौरीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रकरणाच्या गंभीरतेमुळे CBI चौकशीची मागणीही करण्यात आली असून पुढील चौकशीसह या घटनेच्या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रीत झाले आहे.