वरोडा,
science education Maharashtra, विज्ञानाच्या संशोधनासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान किंवा उच्च शिक्षित असणे हा गैरसमज आहे. मनात प्रश्न निर्माण होणे, नाविन्याचा शोध घेणे, कल्पनाशक्तीचा विस्तार, नोंदी या संशोधनाच्या प्राथमिक पायर्या असल्याचे प्रतिपादन आयआयएसईआर पुण्याचे ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांनी केले.विज्ञानासाठी भाषिक विविधतेचे ज्ञान पोषक असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. अशा बाल संमेलनातून भावी संशोधक तयार होतील, असा आशावाद त्यांनी प्रकट केला. लोक शिक्षण संस्था व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनात समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विज्ञान परिषदेचे सचिव डॉ. दिलीप हेर्लेकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर तसेच मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. जेष्ठराज जोशी, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, प्रा. राजीव वर्तक आदी उपस्थित होते.
यावेळी science education Maharashtra, मुंडकर म्हणाले की, समाजातील अंधश्रद्धेला विरोध करून शास्त्रीय ज्ञानाच्या आधारे माणुसकीचा धर्म जपला पाहिजे. डॉ. दिलीप हेर्लेकर यांनी, वरोड्यासारख्या छोट्या गावात विज्ञान संस्कृती जपण्यासाठी लोकशिक्षण संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थी संशोधक व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. उत्तम आयोजनामुळे संमेलन यशस्वी झाल्याची पावती डॉ. जोशी यांनी यावेळी दिली. राज्यातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वैज्ञानिक विषयावर सादर केलेल्या 120 प्रकल्प संशोधनात्मक प्रकल्पांपैकी सर्वोत्तम तीन प्रकल्पांचे सादरीकरण शास्त्रज्ञांसमोर सादर केले गेले.
सुरुवातीला लोकमान्य कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण गीत सादर करून अतिथींचे स्वागत केले. संचालन उमेश लाभे व आभार प्रदर्शन अंजली वरूटकर यांनी केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मंचासमोर नितीन शास्त्रकार यांनी काढलेली विज्ञान विषयक सुंदर रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.