शिवसेना जिल्हा प्रभारीची भाजपा नेते गोलेच्छा यांच्या घरी सदीच्छा भेट
24 Nov 2025 18:24:59
कारंजा लाड,
bjp leader golechha शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच दौर्यात शिवसेना नेते जगदीश गुप्ता यांनी कारंजातील भाजप नेते नरेंद्र गोलेच्छा यांच्या निवासस्थानी दिलेली भेट आता राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहेत. २३ नोव्हेंबर रोजी भाजपा नेते नरेंद्रजी गोलेच्छा यांच्या निवासस्थानी गुप्ता यांनी दिलेली सदिच्छा भेट, ही भेट औपचारिक असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर परिषद निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
कारंजा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली येळणे या अधिकृत उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, त्याच वेळी जिल्हा प्रभारी जगदीश गुप्ता यांनी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निशा रुणवाल गोलेच्छा यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्याचे फोटो व मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, तर दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल मेसेजमुळे कारंजा राजकारणात एकच खळबळ उडाली असून,जिल्हा प्रभारीच दुसर्या पक्षाच्या उमेदवाराला शुभेच्छा देऊ लागले तर स्थानिक पातळीवरील जनतेला काय संदेश जाईल? असा सवाल शिवसेनेतील काही पदाधिकार्यांकडून उपस्थित केला जात आहे.विरोधकांनी या प्रसंगाचा त्वरित राजकीय फायदा घेत टीकेची झोड उठवली आहे.
एकीकडे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार मैदानात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या नेत्याकडून भाजप उमेदवाराला शुभेच्छा दिल्या जात असतील तर मग पक्षनिष्ठा कुठे गेली? अशी टीका प्रतिस्पर्धी पक्षांनी केली आहे. या भेटीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक कार्यालयात मोठी खदखद निर्माण झाली असून, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. काहींनी आपल्या नेत्यांकडे या बाबत स्पष्टीकरण मागितले असल्याचीही माहिती आहे. जगदीश गुप्ता हे जिल्ह्यातील विविध नेत्यांशी सुसंवाद साधण्याच्या भूमिकेत असल्यामुळे ही भेट औपचारिक असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणूक तोंडावर असताना भेटीची वेळ, ठिकाण आणि व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेला राजकीय संभ्रम अद्याप कायमच आहे.bjp leader golechha कारंजा शहरात आता सर्वच पातळीवर या भेटीची चर्चा रंगली असून, ही राजकीय मैत्री आहे का? आंतरिक नाराजीचे संकेत? का निवडणूक समीकरणातील बदल? यावर पुढील काही दिवसात पक्ष नेतृत्व काय स्पष्टीकरण देते आणि स्थानिक पातळीवरील प्रतिक्रिया कशा येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.