राज्यभरात टीईटी पेपरफुटीचा पर्दाफाश!

24 Nov 2025 18:13:31
मुंबई,
TET paper leak exposed राज्यात शनिवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दरम्यान पेपरफुटीचा मोठा घोटाळा कोल्हापूरमध्ये उघडकीस आला आहे. कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसांनी धडक कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह एकूण १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पाच शिक्षकांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
TET paper leak exposed
 
गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी सोनगे येथील एका फर्निचर मॉलवर छापा टाकला. येथे टीईटी परीक्षेचा छायांकित पेपर तब्बल तीन लाख रुपयांना इच्छुक परीक्षार्थींना विकला जात असल्याचे समोर आले. सुरुवातीला नऊ जणांना ताब्यात घेतल्यानंतर तपासाचा विस्तार झाला आणि या रॅकेटची व्याप्ती अपेक्षेपेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट होत गेले. अखेर १८ जणांवर कारवाई करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये काही शिक्षकही असल्याने शिक्षण विभागाने तातडीने त्यांची माहिती मागवली असून पुढील शिस्तभंगात्मक कारवाईची तयारी सुरू आहे.
 
शनिवारी राज्यभरात लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षा देत होते. बहुतांश केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडत असताना कोल्हापूरमध्ये पेपरफुटीची माहिती मिळताच शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले. आरोपींचा संबंध कागल आणि राधानगरी परिसराशी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी नवे संशयित उघडकीस येण्याची शक्यता असून मुरगुड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक रात्रभर तपासात गुंतले आहे. या रॅकेटची व्याप्ती केवळ कोल्हापुरापुरती मर्यादित नसून राज्यभर पसरलेली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. टीईटी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षण विभागाला या प्रकरणात कठोर पावले उचलावी लागणार आहेत.
Powered By Sangraha 9.0