क्रिप्टो मार्केट कोसळताच ट्रम्प यांची कोट्यवधी संपत्ती स्वाहा!

24 Nov 2025 18:02:05
वॉशिंग्टन,
Trump crypto market बिटकॉईनमध्ये आलेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम थेट अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीवर झाला आहे. क्रिप्टो मार्केट कोसळल्यानंतर ट्रम्प यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलर्स, म्हणजेच सुमारे 9,800 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार, ट्रम्प यांची एकूण संपत्ती आता 6.2 अब्ज डॉलर्स इतकी उरली आहे, जी सप्टेंबर महिन्यात 7.3 अब्ज डॉलर्स होती. या घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत झालेली अचानक पडझड. क्रिप्टो मार्केट खाली घसरताच ट्रम्प यांच्या ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुप (TMTG) च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
 
 
bitcoin
 
 
'DJT' टिकरने ट्रेड होणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने घसरण दिसत आहे. शुक्रवारी बिटकॉईनच्या किमती कोसळल्यानंतर TMTG च्या शेअर्समध्ये 10.18 डॉलरची घसरण झाली. गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 35 टक्क्यांनी, तर सहा महिन्यांत 55 टक्क्यांनी खाली आले आहेत. ट्रम्प यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली होती आणि सप्टेंबर 2025 पर्यंत ती 3 अब्ज डॉलर्सने वाढली होती. या वाढीमुळे ते फोर्ब्सच्या अमेरिकेतील 400 श्रीमंतांच्या यादीत 201 व्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र, आता झालेल्या नुकसानीमुळे त्यांची संपत्ती पुन्हा मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. फोर्ब्सच्या मते, ट्रम्प आणि त्यांच्या तीन मुलांनी World Liberty Financial (WLFI) या विकेंद्रीकृत फायनान्शियल प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली होती. सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेल्या या प्लॅटफॉर्मने 100 अब्ज WLFI टोकन तयार केले होते, ज्यातील 22.5 अब्ज टोकन DT Marks DeFi LLC या कंपनीला देण्यात आले होते.
या कंपनीत ट्रम्प यांची सुमारे 70% भागीदारी होती. लाँचवेळी 0.31 डॉलर किंमत असलेलं WLFI टोकन आता 0.158 डॉलरवर घसरले आहे, ज्यामुळे संपत्तीला मोठा फटका बसला. याशिवाय, TMTG ने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे दिलेल्या ताज्या फायलिंगनुसार, कंपनीला तिसऱ्या तिमाहीत 54.8 मिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यापैकी कंपनीच्या बिटकॉईन होल्डिंग्जमध्येच 48 मिलियन डॉलर्सची घसरण झाली. बिटकॉईनच्या किमतीत अलीकडील काळात मोठी चढ-उतार पाहायला मिळाले. 6 ऑक्टोबरला 1 बिटकॉईनची किंमत 1,25,000 डॉलर इतकी होती. पण त्यात 30% घसरण होत ती आता 86,174 डॉलरवर आली आहे. या घसरणीचा थेट परिणाम ट्रम्प यांच्या संपत्तीत जाणवतो आहे.
Powered By Sangraha 9.0