अयोध्या,
Crores of rupees showered on Ram temple अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत कोणत्या दानशूरांनी सर्वाधिक योगदान दिले, याबाबतची माहिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्यजारोहण केले आहे. भगवान राम आणि माता सीता यांच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. राम मंदिरासाठी तयार करण्यात आलेला भगवा ध्वज २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या गेल्या. यामध्ये श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, सर्वाधिक देणगी अध्यात्मिक गुरू मोरारी बापूंनी दिली आहे. त्यांनी ११.३ कोटी रुपये अर्पण केले, तर अमेरिका, कॅनडा आणि युकेमधील त्यांच्या अनुयायांनी दिलेल्या ८ कोटींच्या देणगीतून त्यांचे एकूण योगदान तब्बल १८.६ कोटी रुपये झाले.
सुरतचे प्रख्यात हिरे उद्योजक दिलीप कुमार व्ही. लक्ष्मी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिरासाठी १०१ किलो सोने दान केले. याची बाजारातील अंदाजे किंमत ६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. हे सोने मंदिराचे दरवाजे, गर्भगृह आणि इतर अलंकार सजवण्यासाठी वापरले गेले. देशातील विविध उद्योजकांनीही मोठे योगदान दिले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मंदिर ट्रस्टला २.५१ कोटी रुपये दान केले, तर गुजरातचे दानशूर गोविंदभाई ढोकलिया आणि सुरतचे उद्योजक गोविंदभाई धोकलिया यांनी स्वतंत्रपणे ११ कोटी रुपये अर्पण केले.
ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मुकेश पटेल यांनी रामलल्लासाठी ११ कोटी रुपये किमतीचा हिऱ्याचा मुकुट समर्पित केला. त्याचप्रमाणे दानशूर महेश कबुतरवाला यांनी ५ कोटी रुपये अर्पण केले. पटना येथील महावीर मंदिर न्यास यांनीही १० कोटी रुपयांची देणगी देऊन सहभाग नोंदवला. २०२२ मध्ये ट्रस्टने निधी संकलन मोहीम सुरू करताच देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी रामभक्तांकडून ३ कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झाली. आतापर्यंत राम मंदिरासाठी ५,५०० कोटी रुपये संकलित झाले असून, संपूर्ण देशभरातून मिळणारा हा भावनिक आणि आर्थिक प्रतिसाद अद्यापही सुरूच आहे.