देवळीत डबल इंजिनचा होणार का चमत्कार; अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

25 Nov 2025 20:00:14
संतोष तुरक
देवळी,
municipal-council-general-election : देवळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाच्या शोभा तडस, काँग्रेसचे सुरेश वैद्य तर जनशती आघाडीचे किरण ठाकरे असे प्रमुख तिघे उमेदवार रिंगणात असून या तिघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शयता आहे. येथे आमदार राजेश बकाने आणि माजी खासदार रामदास तडस हे मातब्बर नेते आहे. या डबल इंजिनचा फायदा भाजपाला होण्याची शयता नाकारता येत नाही.
 
 

K
 
 
 
येथील नगर पालिकेच्या राजकारणावर माजी खासदार रामदास तडस यांचा गेल्या अनेक निवडणुकांपासुन वरचष्मा आहे. ते स्वत: नगराध्यक्ष राहिले आहेत. जिल्ह्यात नाही तसे इनडोअर स्टेडिअम आणि नाट्यगृह माजी खासदार तडस यांच्या कार्यकाळात झाले. आलेल्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला आश्वस्त करून पाठवण्याची कला असलेले आ. राजेश बकाने यांनीही शहराचा विकासाचे व्रत घेतले आहे. विेशेष म्हणजे भाजपाच्या उमेदवार शोभा तडस यांच्या नावाला आ. बकाने यांनी एकाशब्दात समर्थन दिल्याने ही निवडणूक त्यांच्याहीसाठी तेवढीच प्रतिष्ठेची झाली आहे. येथे १० प्रभागांसाठी २० सदस्य निवडून देण्याकरिता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागात दारोदारी भेटी, कॉर्नर सभा, बॅनर,—पोस्टर्स, सोशल मीडिया यांचा वापर करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे.
 
 
काही प्रभागात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत तर काही ठिकाणी तिहेरी संघर्षाचे चित्र स्पष्ट होत आहे. अपक्ष उमेदवारही काही ठिकाणी प्रस्थापिताचे गणित बिघडवण्याची शयता नाकारता येत नाही. भाजपाच्या विजयासाठी आ. राजेश बकाने व माजी खासदार रामदास तडस रणांगणात उतरले असून ते प्रचाराची संयुक्तरित्या धुरा सांभाळत आहेत. काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री रणजित कांबळे सक्रिय आहेत. तर जनशक्ती आघाडीचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. तिन्ही पक्षांनी आपली दावेदारी भक्कम असल्याचा दावा केला. येथील प्रभाग ४ च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. येथे आ. बकाने यांचा उजवा हात अशी ओळख असलेले राहुल चोपडा व काँग्रेसचे माजी नगरसेवक व रणजित कांबळे यांचे विश्वासू सुनील बासु यांच्यात थेट लढत आहे.
Powered By Sangraha 9.0