पर्यावरण व आरोग्य क्षेत्रातील संशोधनाने घडेल समाजविकासाचा नवा अध्याय

25 Nov 2025 20:57:38
विधी शर्मा
नागपूर,
amit-bafna : पर्यावरण हा विषय समोर येताच सर्वप्रथम डोक्यात येते ते प्रदूषण आणि या प्रदूषणाने मानवी आरोग्यावर होणारा वाईट परिणाम. पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात थेट संबंध असून यावर आधारित संशोधनाने समाजविकासाचा नवा अध्याय घडविण्याचा काम नागपूरातील सीएसआयआर - नीरीचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. अमित बाफना हे करत आहेत. त्यांच्या कार्याची दाखल घेत स्टॅनफोर्ड–एल्सेव्हियरच्या जगातील टॉप २ टक्के वैज्ञानिकांच्या यादीत डॉ. अमित बाफना यांची निवड झाली आहे. पर्यावरण संरक्षण, मानवी आरोग्य आणि शाश्वत विकास यांना वैज्ञानिक अधिष्ठान देणाऱ्या त्यांच्या कार्याचा हा जागतिक सन्मान आहे.
 
 
BAFNA
 
 
 
'तरुण भारत' शी विशेष संवाद साधताना “विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत नव्हे तर लोकांच्या जीवनमानात बदल घडवण्यासाठी असते,” या मूलमंत्राचे पालन करत समाजहितासाठी आपले ज्ञान समर्पित करत असल्याचे डॉ. बाफना यांनी सांगितले. ‘वन हेल्थ’, पर्यावरणीय सूक्ष्मजीवशास्त्र, बायोरेफायनरी, सर्क्युलर इकॉनॉमी या महत्त्वाच्या क्षेत्रातील त्यांच्या मूलभूत संशोधनाला पुढील टप्प्यात नेण्यासाठी सध्या डॉ. बाफना आणि त्यांचे विद्यार्थी सतत कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हवेतील सूक्ष्मकण, मायक्रोप्लास्टिक्स व औद्योगिक रसायनांचा मानवी जीन, प्रोटीन्स व चयापचयावर होणारा प्रभाव ते आण्विक स्तरावर अभ्यासतात. प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्यधोक्यांसाठी त्यांनी नवे जैवसंकेतक विकसित केले असून हे धोरणात्मक आरोग्यनिर्णयांसाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधकांनी पीएच.डी. पूर्ण केली असून ते विविध संस्थांमध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. अंटार्क्टिक मोहीम, स्पिरुलिना उत्पादनाद्वारे कुपोषण निवारण, औद्योगिक क्षेत्रांतील प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, ताडोबा परिसरातील पर्यावरण अभ्यास यांसारख्या प्रकल्पांमधून ते विज्ञान समाजाच्या दारात पोहोचवत आहेत.
 
 
मुंबई विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्रात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठात औद्योगिक सांडपाण्यातील रंगद्रव्यांच्या जैवविघटनावर महत्त्वपूर्ण पीएच.डी. संशोधन केले. हिंदुस्तान लिव्हर रिसर्च सेंटरमध्ये प्रारंभिक कारकीर्दीनंतर त्यांनी पर्यावरणसेवेच्या ध्यासातून सीएसआयआर–नीरीत प्रवेश केला आणि समाजहिताशी जोडलेल्या अनेक प्रकल्पांना दिशा दिली. जागतिक स्तरावर भारतीय संशोधनाला उंची देणारे डॉ. अमित बाफना हे पर्यावरण आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी नवा मानदंड निर्माण करत आहेत.
Powered By Sangraha 9.0