दिस अबाबा,
Ethiopia volcano eruption पूर्व आफ्रिकेच्या हॉर्नमध्ये वसलेला इथिओपिया हा जगासाठी नेहमीच एक आगळावेगळा देश मानला जातो. कारण इथे वेळ, कॅलेंडर आणि दिवसांची गणना ह्या सर्व गोष्टी जगापेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मोजल्या जातात. जग २०२५ मध्ये जगत असताना, इथिओपियामध्ये मात्र आजही २०१८ साल चालू आहे. सूर्योदयही आपल्या प्रमाणे सकाळी नाही, तर दुपारी १२ वाजता मानला जातो. वर्षात १२ नव्हे तर १३ महिने असणारे हे देशाचे गीझ कॅलेंडर प्राचीन इजिप्शियन आणि कॉप्टिक परंपरेवर आधारित आहे.
याच ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा जपणाऱ्या इथिओपियामधील अफार प्रदेशात हजारो वर्षानंतर अचानक एक मोठा ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला. जवळपास १२,००० वर्षांपासून सुप्त अवस्थेत असलेल्या या ज्वालामुखीच्या उद्रेकाने आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांना हादरवून टाकले आहे. उद्रेकानंतर राख आणि धुराचे प्रचंड ढग तब्बल १४ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले आणि काही तासांतच हे ढग सर्व दिशांनी पसरू लागले.
या राखेचा सर्वाधिक परिणाम भारतावर दिसला, कारण हवामानशास्त्र विभागानुसार वाऱ्याच्या दिशेमुळे राखेची घनदाट पट्टी दिल्लीच्या दिशेने सरकली. त्यानंतर हीच राख चीनकडेही प्रवास करत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. विमान वाहतुकीपासून हवेच्या गुणवत्तेपर्यंत अनेक क्षेत्रांवर याचा तात्पुरता परिणाम जाणवू शकतो, अशी तज्ज्ञांचीही नोंद आहे. जगातील इतर देशांनी स्वीकारलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ७ ते ८ वर्षे मागे असलेल्या इथिओपियामध्ये महिन्यांची रचना देखील वेगळी आहे. १२ महिने प्रत्येकी ३० दिवसांचे आणि उरलेल्या पाच किंवा लीप वर्षात सहा दिवसांचा तेरावा महिना ‘पॅगुमेन’. इथिओपियन नवीन वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू होते आणि ‘मेस्केरेम’ या फुलांनी भरलेल्या महिन्यापासून याला सुरुवात होते.
संस्कृती, भाषा आणि परंपरांच्या दृष्टीनेही हा देश विलक्षण आहे. ८० पेक्षा अधिक वांशिक गट, गिज लिपी, हजारो वर्षे जुनी ख्रिश्चन परंपरा आणि लालिबेलाच्या शिलाखोदित चर्चमधील आजही सुरू असलेली पूजा इथिओपिया आजही आपली ओळख जपून आधुनिक जगात स्वतःचे स्थान वेगळे ठेवतो. मात्र या शांत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेशातून अचानक उठलेल्या ज्वालामुखीच्या राखेने आता जगाच्या हवामानाला आणि हवाई मार्गांना काही काळ सतर्क करणे भाग पडले आहे. हजारो वर्षांनी पुन्हा जागा झालेल्या या ज्वालामुखीने आफ्रिकेपासून आशियापर्यंत चिंता निर्माण केली असून पुढील काही दिवस परिस्थिती कशी बदलते याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.