चक्क चारचाकी वाहनात सुरू होते गर्भलिंग निदान

25 Nov 2025 11:17:04
नाशिक,
In-vehicle sex determination नाशिकमध्ये चारचाकी वाहनात पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळगून अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी चाळीसगाव येथील डॉ. बाळासाहेब नारायण पाटील यांच्या विरोधात नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सोनोग्राफी यंत्र विक्री करणाऱ्या जी ई हेल्थ केअर कंपनीलाही सहआरोपी करण्यात आले आहे. प्रकरण उघडकीस आले तेव्हा वडाळा-पाथर्डी रोडवर इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणी दरम्यान १७ मार्च २०२५ रोजी मारुती स्वीफ्ट (एमएच १९ डी व्ही १३७८) या वाहनातून पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र जप्त झाले. यंत्र जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यावर गर्भलिंग निदानासाठी वापरले जात असल्याचे आढळले. या प्रकारानंतर वाहन आणि यंत्र जप्त करून प्रकरण नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले.
 

garbh nidan 
महापालिकेच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीमार्फत सखोल चौकशी केली असता डॉ. पाटील यांनी विनापरवाना सोनोग्राफी यंत्र बाळगणे आणि वाहतुक करणे हे दोष सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमातील कलम ३, ६, १८, २३, २५, २६ आणि २९ अन्वये जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी सांगितले की, या प्रकरणात जी ई हेल्थ केअर कंपनीने मनपाची परवानगी न घेता यंत्र विक्री केली, त्यामुळे तीही सहआरोपी आहे. तसेच चाळीसगावसह आसपासच्या गावांमध्ये डॉ. पाटील वाहनात रुग्णांना बसवून अवैधरित्या गर्भलिंग निदान करत असल्याच्या तक्रारी पुण्यातील पीसीपीएनडीटी विभागाकडे देखील नोंदवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर आता जिल्हा न्यायालयात खटला चालणार आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास डॉ. पाटील यांना पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0