चंदिगढ,
Inauguration of the Panchajanya Conch Memorial पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र पंचजन्य शंखाच्या सन्मानार्थ उभारलेल्या भव्य ‘पंचजन्य शंख स्मारकाचे’ उद्घाटन केले. या प्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी ‘महाभारत अनुभव केंद्रा’लाही भेट दिली. महाभारतकालीन घटनांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समोर आणणारे हे केंद्र, त्या कालखंडाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्व प्रभावीपणे दर्शवते. यानंतर पंतप्रधान मोदी गुरु तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहीद जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गुरु तेग बहादूर यांच्या सन्मानार्थ स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी १५५ एकर परिसरात व्यापक व्यवस्था करण्यात आली होती, तर २५ एकरातील मुख्य पंडाल विशेष आकर्षण ठरला. मंचाच्या एका भागात तब्बल ३५० मुलींनी कीर्तन सादर केले. शीख परंपरेनुसार, पंतप्रधानांसह सर्व मान्यवरांनी जमिनीवर बसून श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी गुरु ग्रंथ साहिबची विधिवत प्रतिष्ठापना केली होती. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि राव इंद्रजीत सिंग यांनीही कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. दिवसाच्या शेवटी पंतप्रधानांनी पवित्र ब्रह्मसरोवर येथे संध्याकाळी आरतीत सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय गीता जयंती मेळा प्राधिकरणानुसार, पंतप्रधानांनी सुमारे दहा मिनिटे आरतीत सहभाग नोंदविला. त्यांचा संपूर्ण दौरा जवळपास अडीच तासांचा होता.
गुरु तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहीद जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कुरुक्षेत्र दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराच्या १९१ फूट उंच शिखरावर भगवा ‘धर्मध्वज’ फडकवून निघाले होते. ओम, सूर्य आणि कोविदार वृक्ष अशी सनातन मूल्यांचे प्रतीक असलेली तीन पवित्र चिन्हे या ध्वजावर अंकित आहेत. १० फूट उंच आणि २० फूट लांबीचा हा काटकोन त्रिकोणी ध्वज धार्मिक गौरवाचे प्रतीक ठरला.