मध्य प्रदेशात चित्त्यांचे ‘नवे घर’ तयार

25 Nov 2025 17:05:51
भोपाळ,
New home for cheetahs in Madhya Pradesh मध्य प्रदेशात चित्त्यांच्या पुनर्वसनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता नवे वळण मिळणार आहे. राणी दुर्गावती (नौरादेही) व्याघ्र प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी आणि अर्थसहाय्य मिळाल्याने येत्या काही वर्षांत हा परिसर देशातील तिसरा मोठा चित्ता अधिवास बनेल. २०२६ च्या उन्हाळ्यात आफ्रिकन चित्त्यांचा एक नवीन गट येथे आणण्याची तयारी सुरू झाली असून संपूर्ण प्रकल्प युद्धपातळीवर राबवला जात आहे.
 
 
cheetahs in Madhya Pradesh
 
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ‘चित्ता प्रकल्प’ अंतर्गत नौरादेहीमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिवास विकासाचे काम गतीने सुरू आहे. सुमारे ६०० चौरस किलोमीटरचा प्रदेश चित्त्यांसाठी निवडण्यात आला असून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अंदाजे २० किमी लांबीचे कुंपण उभारले जात आहे. या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कुंपणासह पाच मोठ्या क्वारंटाइन एन्क्लोजर आणि चार सॉफ्ट-रिलीज क्षेत्रांची निर्मिती सुरू आहे.
 
 
भारतीय वन्यजीव संस्था (WII) देहरादूनमधील तज्ञांची टीम लवकरच प्रकल्पाचा दुसरा आढावा घेणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अधिवास विकास आणि चित्त्यांसाठी योग्य वातावरण तयार करण्याची प्रक्रिया अधिक वेग घेणार असल्याची माहिती रिझर्व्हचे उपसंचालक डॉ. ए.ए. अन्सारी यांनी दिली. तज्ञांच्या अहवालानुसार सागर जिल्ह्यातील मोहली आणि सिंगपूर पर्वतरांगा तसेच दमोहजवळील झापण पर्वतरांग चित्त्यांच्या वर्तन, भक्ष्य उपलब्धता आणि हवामानाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आढळल्या आहेत. त्यामुळे या विस्तृत प्रदेशात पाण्याचे नवे स्रोत निर्माण करणे, गवताळ क्षेत्रांचा विस्तार आणि शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढवणे या प्राथमिक गोष्टींवर भर दिला जात आहे. चित्त्यांना मुक्तपणे फिरण्यासाठी आणि शिकार उपलब्धतेसाठी गवताळ प्रदेश मोठ्या प्रमाणात विकसित केले जात आहेत.
 
चित्ता प्रकल्पासाठी मिळालेल्या निधीतून क्वारंटाइन क्षेत्र, सॉफ्ट रिलीज कुंपण आणि सीमाभिंतीचे बांधकाम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ज्या भागात चित्ते आणण्यात येणार आहेत त्या संपूर्ण परिसराभोवती २० किलोमीटरचे कुंपण उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे डॉ. अन्सारी यांनी स्पष्ट केले. या सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर २०२६ मध्ये आफ्रिकन चित्त्यांचा नवीन कळप नौरादेहीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील वन्यजीव संवर्धनाला नवे बळ मिळणार असून नौरादेही व्याघ्र प्रकल्प देशाच्या जैवविविधतेतील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0