वेध...
विजय निचकवडे
actor dharmendra चित्रपट केवळ कथा नव्हे, असे अधोरेखित करीत आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंत करणारा अभिनेता धर्मेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले. कुणीही सिद्धहस्त नसतो; मात्र संघर्षातून व्यक्ती घडत जाते. अशाच संघर्षाच्या अनेक खाचखळग्यातून वाटा काढीत आपले वेगळेपण दाखवून देतानाच, गत 65 वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या अभिनेत्याच्या जाण्याने एक संघर्षगाथा संपली, असे म्हणता येईल.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याची प्रचीती 15 दिवसांपूर्वी आली. हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळेपण अधोरेखित करणारे ‘ही मॅन’ अशी ओळख असलेले अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त वाहिन्यांवर आले. मात्र नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी वास्तविकता पुढे मांडून धर्मेंद्र उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर नंतर घरीच उपचार सुरू होते. दरम्यान, 15 दिवसांपूर्वी न आलेली वेळ 24 नोव्हेंबर रोजी आली अन् असंख्य चाहत्यांना वेड लावलेला अभिनेता जगाचा निरोप घेत निघून गेला. खरं तर धर्मेंद्र यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द आणि त्यांनी केलेला खडतर प्रवास हा त्यांच्या जिद्द आणि चिकाटीची परीक्षा घेणारा होता. त्यातही न डगमगता चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख देण्याचे धाडस आपल्यातच आहे, हे त्यांनी दाखवून दिले. शिक्षकाचा मुलगा, मात्र अभ्यासाची फारशी आवड नाही. आपण पडद्यावर दिसावे या भोळ्या आशेने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतो; स्वतःच्या अभिनय शैलीच्या जोरावर जे काही यश संपादन करतो, ते सुवर्ण अक्षरात लिहावे असेच!
काहींकडे देखणेपणा, काहींकडे अभिनय अशा वैशिष्ट्यांसह हृदय जिंकणाऱ्या कलावंतांपैकी धर्मेंद्रही त्या काळी एक होते. साधेपणा, प्रामाणिकता आणि मेहनती स्वभाव घेऊन 1960 साली ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ या पहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. काळ पुढे जात असताना अभिनायाच्या अनेक संधी मिळाल्या आणि त्यांच्यातील अभिनयाच्या छटा उलगडत गेल्या. बंधन, सत्यनाम, आई मिलन की बेला हे चित्रपट कायम चाहत्यांच्या स्मरणात घर करून राहावे असेच आहेत; ज्यात धर्मेंद्र यांच्या बहुआयामी अभिनयाची ओळख चित्रपटसृष्टीला झाली. चॉकलेट हिरो, रोमँटिक आणि अॅक्शन हिरो म्हणून स्वतःला अभिनयाच्या वेगवेगळ्या पठड्यांवर त्यांनी सिद्ध केले. ‘फूल बने पत्थर’ चित्रपटाने ‘ही मॅन’ म्हणून ओळख निर्माण करण्यात धर्मेंद्र यशस्वी झाले होते.
पडद्यावर रडता येत नव्हते. दुःख आणि राग या भावनांना चेहऱ्यावर व्यक्त करताना गोंधळ उडणारा हा अभिनेता मात्र जाता जाता चाहत्यांना रडवून गेला. नाचणे माहीत नसलेला हा अभिनेता नंतर मात्र ही कसोटीही तेवढ्याच दिमाखात यशस्वी झाला होता. ‘स्त्रीचे सौंदर्य पहावे आणि पुरुषांचा पराक्रम पहावा’ अशा मानसिकतेच्या असलेल्या हिंदी सिनेमासृष्टीत स्त्रीच्या दृष्टीने पुरुषाचे सौंदर्यही ‘पाहण्याचा विषय’ असू शकतो, असा धडा धर्मेंद्रने ‘फूल और पत्थर’ चित्रपटाच्या माध्यमातून घालून दिला. बलदंड कमावलेले शरीर व त्याच्या विसंगत आपुलकीने काठोकाठ भरलेला चेहरा प्रेम आणि प्रसंगी आपले रक्षणही करू शकतो हे आश्वस्त करणारा धर्मेंद्र यांचा अभिनय चित्रपटसृष्टीला नवी दिशा आणि नवा आयाम देणारा ठरला.
शोले चित्रपटातील ‘वीरू’ कुणी विसरू शकेल? अनेक अजरामर चित्रपटांपैकी शोलेने गाजविलेला काळ विलक्षण असाच होता. म्हणूनच तर आजही आपल्या हक्कासाठी आंदोलने होतात, ती शोले स्टाईलने! हिंदी चित्रपटसृष्टीला नवे आयाम, अभिनयाच्या नवनवीन कक्षा वृद्धिंगत करण्याचे काम या अभिनेत्याने केले. 65 वर्षे सिनेसृष्टीची सेवा केली; मात्र कुठेही वेगळा आविर्भाव नाही! अभिनेता म्हणून काम करताना, राजकारणात ‘नेता’ म्हणून काम करण्याचा प्रयत्न झाला, पण राजकारण त्यांना भावले नाही. फिल्मफेअर अवॉर्ड, 2012 साली मिळालेला पद्मभूषण पुरस्कार हे धर्मेंद्र यांच्या अभिनयासह माणुसकीचे कौतूक करणारेच म्हणावे लागेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या संघर्षगाथा आता संपली असली, तरी त्यांच्या अष्टपैलू अभिनयाची, साधेपणा आणि स्वभावातील सौम्यतेची जी छटा असंख्य चाहत्यांच्या मनावर कोरली गेली आहे, ती पुसट होणे नाही. विविध धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना 300 हून अधिक चित्रपटांची देणगी देणारा हा अभिनेता ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ म्हणत असला, तरी असंख्य दोस्तांना सोडून तो निघून गेला, हेच वास्तव आहे.
976371341