जुळ्या शहराच्या विकासासाठी भाजपाला मते द्या

27 Nov 2025 20:56:35
अचलपूर, 
chandrasekhar-bawankule : दोन तारखेची निवडणूक ही शहराच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक महत्त्वाची असून चुकीच्या उमेदवाराला दिलेल मत तुम्हाला मिळणार्‍या शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाही. शहराचा, परिसराचा विकास खुंटल्या जाऊ शकतो, म्हणून भाजपालाच मते द्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परतवाडा येथे आयोजित प्रचारसभेत केले. अचलपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रूपाली माथने, चांदूर बाजारच्या कांताबाई अहीर, अंजनगावचे अविनाश गायगोले, दर्यापूरच्या उमेदवार नलिनी भारसाकळे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते .
 
 
amt
 
पालकमंत्री पुढे म्हणाले की, शहरातील १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी जी घरे नझूलच्या जागेत बांधली गेली त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड सरकार देणार आहे. शहराच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावू. केंद्राच्या व राज्याच्या १२४ योजना नगरपालिकांद्वारे राबविल्या जातात, त्या योजनांचा लाभ घेण्याकरिता शहरात भाजपची सत्ता आणा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील भाजप सरकारने शेतकर्‍यांचे २७०० कोटी रुपयांचे वीज बिल माफ केले. शेतीला मोफत वीज दिली. कर्जमाफी देखील जाहीर केली, त्यामुळे हे सरकार शेतकरी हिताचे निर्णाय घेणारे सरकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
 
 
यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण तायडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व उपस्थित अनेक नेत्यांची भाषणे झाली. मंचावर आमदार केवलराम काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदेले, निवडणूक प्रभारी विनोद वाघ , भाजप पदाधिकारी जयंत डेहणकर, गजानन कोल्हे, जिल्हा सरचिटणीस सुधीर रसे, प्रमोद कोरडे, तुषार खेरडे, मंडल अध्यक्ष कुंदन यादव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली अभय माथने, कांताबाई अहीर, नलिनी भाळसाकळे, अविनाश गायगोले यांच्यासह ३८ उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
विरोधकांना चूप करा : नवनीत राणा
 
 
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मोदीजी व योगीजी यांनी बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असा नारा दिला होता. आता आम्ही ना बटेंगे ना कटेंगे, एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे, और भाजप को चून कर भी लायेंगे. मोदीजींनी परवाच भगवा धर्म ध्वज फडकवला. त्यावर भारतातील काहींनी व पाकिस्तानातून बोट दाखवल्या जात आहे. त्यांना चूप करण्याचे काम तुमच्या एका मतात आहे. तुमचे योग्य ठिकाणी जाणारे मतच त्यांना कायमचे चुप करू शकते व वेळ पडल्यास धर्माकडे बोट दाखवणार्‍याचे बोटही तोडण्याचे काम भाजपाच करू शकते. त्यामुळे भाजपलाच मते द्या, असे आवाहन नवनीत राणा यांनी केले.
Powered By Sangraha 9.0