अमरावती,
B.C. Bhartia : देशातील स्वदेशी कंपन्या व उत्पादकांना लाभ मिळावा तसेच भारतीयांमध्ये याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी १५ नोव्हेंबरपासून स्वदेशी स्वावलंबन संकल्प रथयात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा शुक्रवार २८ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये दाखल होणार आहे. सदर यात्रेची माहीती गुरुवारी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कैट) वतीने पत्रपरिषदेत देण्यात आली.
पत्रपरिषदेत कैटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वदेशी, स्वावलंबनाचे आवाहन जनतेपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी संकल्प रथयात्रा काढण्यात आली आहे. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) नवी दिल्ली आणि स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा देशवासीयांना स्वदेशीचे महत्त्व, स्वावलंबनाची भावना आणि स्थानिक उत्पादनांचा वापर याबद्दल जागृत करणार आहे. स्वदेशी स्वीकारणे म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरणाचे साधन नाही तर राष्ट्राच्या आत्म्याला बळकट करण्याची प्रतिज्ञा देखील आहे.
स्वदेशी राष्ट्रीय पुनर्जागरणाचा मार्ग आहे. यासाठी, देशभरात व्यापक स्वदेशी चळवळीची आवश्यकता आहे. भारताने व्यापार, उद्योग, शिक्षण आणि उपभोगाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वदेशी तत्त्वांना प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे देशाचे आर्थिक स्वावलंबन बळकट होणार आहे. याशिवाय जागतिक स्पर्धेत भारताला एक मजबूत आणि सन्माननीय स्थान प्राप्त होणार आहे. सदर यात्रा विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधून जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वदेशी जागरण मंच आणि कॅटशी संबंधित व्यापारी यात्रेचे स्वागत करणार आहेत.
अमरावतीत यात्रेची जबाबदारी कैटचे विदर्भ राज्य अध्यक्ष विनोद कलंत्री आणि राष्ट्रीय समन्वयक श्याम शर्मा यांच्यावर सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कैटचे विनोद कलंत्री, विनोद पांडे, श्याम शर्मा, गोविंद सोमानी, एकवीरा महिला विंग प्रमुख डॉ. कुंजन वेद, महामंत्री डॉ. केतकी काळेले - भोकरे, विधी नावंदर आदी उपस्थित होते.
४० खासदारांची साथ
कैट व स्वदेशी जागरण मंचच्या पदाधिकार्यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी अनेक खासदार उपस्थित होते. स्वदेशी समर्थनार्थ ४० खासदारांचे समर्थन मिळाले आहे. ही चळवळ अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.