बोगस जन्म व मृत्यू प्रमाणपत्र प्रकरण; ९६२ जणांविरोधात पोलिसांत तक्रार

27 Nov 2025 20:54:26
अमरावती, 
fake-birth-and-death-certificate-case : बोगस कागदपत्रांच्या आधारावार ९४२ जन्म व २० मृत्यू दाखले घेणार्‍यांच्याविरोधात अमरावती तहसीलदारांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात ५३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आमच्या सततच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
bjp
 
 
 
उपरोक्त प्रकरणचा आढावा घेण्यासाठी किरीटी सोमय्या शुक्रवारी पुन्हा अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्यांनी दाखल्यांसाठी अर्ज दिले, त्यांनी पुरावा म्हणून फक्त आधार कार्ड दिले आहे. त्यांच्या अर्ज आणि शपथपत्रांच्या तारखांमध्ये तफावत आढळून आलेली नाही. प्रमाणपत्र देताना प्रशासकीय अधिकार्‍यांनी काळजी घेतली नाही, हे जिल्हाधिकार्‍यांनी सुद्धा मान्य केले आहे. विशेष म्हणजे, ज्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलेले नाही. याचाच अर्थ त्यांच्याकडे सक्षम कागदपत्रे नाही.
 
 
ज्यांच्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रे आहे, अशाही काही व्यक्तींचे प्रमाणपत्र रद्द झाले असेल तर त्यांना अर्ज करून ते पुन्हा मिळविता येणार आहे. पण, ज्यांनी बोगस कारभार केला आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. ज्यांना वाटते ते बांगलादेशी नाही तर त्यांनी भारतीय असल्याचे सिद्ध करावे. काँग्रेस खासदार व काही नेत्यांनी सुरू असलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला होता, त्यांनी आता नव्याने समोर आलेल्या बोगस प्रमाणपत्रावर आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा त्यांची मुळ कागदपत्रे सादर करावी, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले. पत्रकार परिषदेला भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, किरण पातुरकर, सुधा तिवारी, बादल कुळकर्णी, विक्की शर्मा, श्याम पाध्ये, राजेंद्र मेटे, प्रवीण वैश्य, शैलेंद्र मिश्रा, विवेक चुटके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
तहसीलदाराची विभागीय चौकशी करा
 
 
प्रमाणपत्रे देण्यात अनियमितता झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी मान्य केले आहे. ज्या तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र दिले आहे, त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी मी राज्य शासनाकडे केली आहे. मालेगावात अशी चौकशी सुरू झाली असून काहींवर गुन्हे देखील दाखल झाले आहे. अमरावतीत चौकशी होईल, हा विश्वास असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0