ऋषिकेशची हत्या करणार्‍यांची धिंड काढा

27 Nov 2025 20:58:28
अमरावती, 
ravi-rana : ऋषिकेश खोपकरची हत्या करणार्‍यांची शहरातून धिंड काढा, अशी संतापयुक्त मागणी आ. रवी राणा यांनी पोलिस आयुक्तांकडे केली असून ऋषिकेशच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
 
 
rana
 
 
बडनेरा शहरात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड धाक निर्माण करणारी घटना सावता मैदान परिसरात घडली. मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारास वस्तीमध्ये घुसून घरातून बाहेर काढून दहा ते बारा जणांनी ऋषिकेश खापेकर ह्या २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केली आणि कोणी पोलिसांना कळवले तर तुम्हाला सुद्धा जीवे मारू अशी धमकी त्यांच्या घरच्यांना व शेजार्‍यांना दिली. सदर घटनेने प्रचंड संताप नागरिकांमध्ये असून आमदार रवी राणा यांनी मृतक ऋषिकेशच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ऋषिकेश हा अतिशय गरीब परिवारातून असून कुटुंबियांचा कर्ता असून आधार होता. त्यांच्या मागे त्याची सासू, पत्नी आणि फक्त १२ दिवसाची मुलगी होती. विशेष म्हणजे त्या लहान बाळाचा नामकरण विधी सोहळा येत्या ३ दिवसात होणार होता.
 
 
संपूर्ण परिवार आणि ऋषिकेश ह्याच आनंदात असतांना अचानक घडलेल्या ह्या दुर्दैवी घटनेने प्रचंड दुःख ह्या परिवाराच्या वाट्याला आल्याचे आमदार रवी राणा यांनी जाणून घेतले आणि पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण ह्यांना चांगलेच फैलावर घेतले. सोबतच पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांना कॉल करून आरोपींची भर वस्तीत धिंड काढून धुलाई करा आणि बडनेराची स्थिती सुधारा, गुन्हेगारांना वठणीवर आणा अशी मागणी केली. सोबतच ऋषिकेशच्या परिवाराला वैयक्तिकरीत्या १ लाख रोख मदत करण्याचे जाहीर केले. यावेळी आमदार रवी राणा यांच्या सोबत भाजपा सरचिटणीस गौरव बांते, युवा स्वाभिमाचे शहर अध्यक्ष अजय जयस्वाल, किरण अंबाडकर, समीक्षा गोटेफोडे, ज्योत्स्ना अंबाडकर, संदीप इंगोले, बजरंग दलचे प्रमुख श्रीरंग बडनेरकर, सतीश साबळे, उमेश बेदूरकर, आदित्य कावरे, जगदीश कडव आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थितत होते.
Powered By Sangraha 9.0