वेध
prevent leprosy कोरोना काळातील भयावहता अद्याप सर्वांच्या स्मरणात असेलच. सख्ख्या नात्यातील परकेपण या कालावधीत सर्वांनीच अनुभवले. समाजातील मानवी मूल्ये आणि संवेदना जणू नष्ट झाल्या होत्या. अजूनही मागे वळून पाहिल्यानंतर अंगावर शहारे यावे इतक्या कटू आठवणी तेव्हाच्या आहेत. पण यावरही वैद्यकशास्त्राने तोडगा काढून मात केली. वास्तविक इतिहासातील हा काही पहिला प्रसंग नव्हता. यापूर्वीही असाध्य आजारांनी थैमान घातल्याचे दिसून येते. पण काही आजार समाजात संवेदनाशून्य परिस्थिती निर्माण करतात. मग ती केवळ आरोग्याची समस्या न राहता सामाजिक अभिशाप ठरतो. गत शतकात महारोग अर्थात कुष्ठरोग हा असाच आजार होता. त्याकाळी असाध्य असणाऱ्या या आजारावर आता उपचार शक्य आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात देखील यश मिळाले आहे. नव्हे गत काही दशकांत तर त्याचे निर्मूलन झाले असे देखील म्हटले जात होते. पण नुकत्याच राज्यात सुरू असलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत अकोला जिल्ह्यात 11 नवीन रुग्ण आढळून आले. तर तब्बल 3,996 संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली. एका जिल्ह्यातील संशयित रुग्णांची ही आकडेवारी धक्कादायक आहे.
या आजाराबाबत आता गांभीर्याने उपाययोजना झाल्या नाहीत तर समाजवीण उद्ध्वस्त करणारे भविष्यातील मोठे संकट येऊ शकते. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टीरियम लेप्रे या जीवाणूमुळे होतो. या आजारात सुरुवातीला शरीरावर संवेदनाहीन चट्टा आढळतो. हळूहळू संसर्ग वाढून काही ठिकाणच्या संवेदना कमी व्हायला लागतात. हात-पाय विकृत होणे अशी लक्षणेही आढळतात आणि नंतर रुग्णामध्ये न्यूनगंड वाढण्यास सुरुवात होते. सख्खे नातलग देखील अज्ञान आणि गैरसमजामुळे आजारी व्यक्तीला दूर ठेवतात. गत शतकात या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची अतिशय दैना होती. हा आजार झालेला रुग्ण महारोगी म्हणून ओळखला जाई. त्याच्या स्पर्शाने इतरांना हा रोग होईल म्हणून त्याला गावाबाहेर निर्वासित करण्यात येत होते. विविध सण, समारंभ आणि सार्वजनिक उत्सवात त्यांना स्थान नसे. सर्वांत भयंकर म्हणजे अशा रुग्णांना बहिष्कृत केल्यानंतर उपजीविकेसाठी साधन उपलब्ध नसत. एकीकडे आजाराने ग्रस्त तर दुसरीकडे कुटुंब, सख्ख्या नातलगांचा बहिष्कार यामुळे रुग्ण मानसिकरीत्या खचून जात असत. अशा काळातही कुष्ठरुग्णांच्या मदतीसाठी अनेक महनीय व्यक्तींनी पुढाकार घेतला. यापैकीच एक म्हणजे सदाशिव गोविंद कात्रे. सदाशिव कात्रे हे स्वत: कुष्ठरोगी होते. या आजारामुळे त्यांचे हात-पाय बाधित झाले. पण स्वतःच्या वाटेला आलेले दुःख बाजूला सारत त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचा संकल्प केला. अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी छत्तीसगड राज्यातील चंपा जिल्ह्यात जांजगिर येथे भारतीय कुष्ठ निवारक संघाची स्थापना केली.prevent leprosy त्यांच्या प्रयत्नातून अनेक रुग्णांना आधारासह निवारा, औषधोपचार, पुनर्वसन, कौशल्य प्रशिक्षण त्यांनी दिले. अनेक रुग्ण बरे होऊन पुन्हा स्वाभिमानाने जीवन जगायला लागले. महात्मा गांधी, विनोबा भावे, बाबा आमटे यांनी देखील त्यावेळी कुष्ठरोग्यांंना मोेठा आधार दिला. अमरावती येथील डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी देखील विदर्भ महारोगी सेवा मंडळाची स्थापना करून अमरावती येथे तपोवन परिसरात कुष्ठरोग्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी जीवन समर्पित केले. पश्चिम विदर्भातील कुष्ठरोग्यांसाठी तपोवन हे मोठे आधार केंद्र होते.
खरं म्हणजे आता कुष्ठरोग हा काही असाध्य श्रेणीत मोडणारा आजार नाही. वैद्यकशास्त्राने केलेल्या प्रगतीमुळे सुरुवातीलाच आजाराचे निदान होते. तर अगदी काही महिन्यांच्या उपचारानंतर रुग्ण बरा होतो. हे खरे असले तरी गैरसमज, अज्ञानातून रुग्णाने याकडे दुर्लक्ष करणे सोयीचे नाही. शासनस्तरावर कुष्ठरोग निर्मूलन, नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेतच. त्यासाठी तपासणी आणि सर्वेक्षण देखील करण्यात येते. पण याच प्रकारच्या तपासणीत आढळलेली ही संशयित रुग्णसंख्या धक्कादायक आहे. त्यामुळे या आजाराचा धोका, व्याप्ती वेळीच ओळखली पाहिजे. सदाशिव कात्रे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी यासाठी जीवन समर्पित केले. आताची आकडेवारी पाहता पुन्हा अशाच समर्पणासाठी समाजातील स्वयंसेवी संघटनांसह सामाजिक भान असणाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
नीलेश जोशी
9422862484