वेध...
रेवती जोशी-अंधारे
9850339240
asia cup चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्याच्या भारतवासीयांच्या आनंदावर विरजण घालत, भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर घातलेले सपशेल लोटांगण भारतातील क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागणारे आहे. घरच्या मैदानावर लागोपाठ दुसऱ्यांदा क्लिन स्वीप आणि गेल्या सहा दशकांतील सर्वांत वाईट रेकॉर्ड! डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा या पराभवासोबत अंधुक झाल्या आहेत. भारतीय कसोटी क्रिकेटला मुळापासून हलवणारी ही ‘कामगिरी’ जागतिक क्रमवारीत भारताला अव्वल स्थानावरून पाचव्या क्रमांकावर घेऊन गेली आहे. पाकिस्तानचा संघ आपल्यापुढे गेल्याचे दु:ख त्याहून बोचरे आहे. कधी काळी घरच्या मैदानावर अभेद्य मानल्या जाणारा भारतीय क्रिकेटच्या परंपरेला या लाजिरवाण्या प्रदर्शनाने अक्षरश: धक्के दिले आहेत. गेल्या 66 वर्षांत पहिल्यांदाच, मायभूमीवर खेळल्या गेलेल्या 7 कसोटी सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये आपल्या दिग्गजांनी सपशेल पराभव स्वीकारला. हा पराभव केवळ धावफलकापुरता मर्यादित राहिला नाही. त्यातून क्रिकेटप्रेमींचा अभिमान, देशाची शान आणि स्वत: खेळाडूंचा आत्मविश्वास सगळेच पणाला लागले. एकेकाळी जगभरातील क्रिकेट संघ भारतात कसोटी सामने खेळायला येण्यासाठी घाबरायचे. भारतीय फिरकीपटूंची आणि चिवट फलंदाजांची दहशत होती. पण, आता चित्र बदलले आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला 408 धावांनी हरवून शब्दश: चिरडले आणि लोळविले. हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या धावसंख्येने झालेला पराभव आहे.
आतापर्यंत भारताला हरविण्याचा हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. पाहुण्या कांगारूंनी 2004 मध्ये भारतीय संघाला नागपूर कसोटीत 342 धावांनी हरविले होते. कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकून, त्यांनी गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच भारताला मायभूमीवर कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरवले. त्यांनी आपल्याला हरवले की, आपण त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू तर नवख्यासारखे खेळले. नेतृत्वातील उणिवांसोबतच रणनीतीचा अभाव, गेम टेक्निकची उणीव आणि आत्यंतिक खालावलेला आत्मविश्वास हे दिसत होते. ‘ब्लीड ब्ल्यू’ म्हणत क्रिकेटपटूंच्या प्रेमात वेडावलेल्या भारतीय चाहत्यांच्या डोळ्यांपुढे टेम्बा बावुमाच्या संघाने दिवसाढवळ्या चांदण्या चमकवल्या. टेम्बाने सामन्याच्या आधीच समाज माध्यमावरील संदेशांमधून, आम्ही भारतीय संघाला गुडघ्यांवर आणू, अशा अर्थाच्या पोस्ट्स करून, वातावरण निर्मिती केलीच होती. सामना जिंकल्यावर ‘अ स्पेशल वन’ हे तीनच शब्द पोस्ट करून त्याने भारतीय संघाला अगदी सर्वसाधारण गटात टाकून दिले. कणा मोडलेला भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही बाबतीत ढेपाळला. मुळात कसोटी सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडूंना खेळविण्याचा हट्ट अजिबात ‘गंभीर’ नव्हता. प्रयोग करायलाच हवेत. पण, कधी, केव्हा आणि किती, हे ठरविण्याची गरज आहे. ‘रो-को’ सारखे प्रस्थापित खेळाडू संघात नसताना, नवीन नेतृत्व, नवे व्यवस्थापन या सगळ्या नव्याच्या नवलाईत, युवा खेळाडू मैदानावर अवघडल्यासारखे खेळत होते. भारतीय संघाच्या कमकुवतपणाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायदा घेतला आणि ‘क्लीन स्वीप’ भारतीयांच्या डोक्यावर टाकला. गेल्या वर्षी न्यूझीलंडने 3-0 ने पराभवाची माळ आपल्या गळ्यात टाकली.asia cup तेव्हाच कारणमीमांसा आणि विचारमंथन ‘गंभीर’पणे झाले नसावे. अन्यथा हा प्रसंग उद्भवला नसता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यकाळात आतापर्यंत भारतीय संघाने 19 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 10 मध्ये पराभव, 7 सामन्यांमध्ये विजय आणि 2 सामने अनिर्णीत झाले आहेत. म्हणजेच भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी केवळ 36.82 टक्के आहे. अर्थात, केवळ गंभीरला दोषी धरता येणार नाहीच. आंतरराष्ट्रीयय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडून किमान आपली जबाबदारी ओळखण्याची अपेक्षा गैर नसावी. खेळपट्टीची स्थिती, मैदानावरील कच्ची रणनीती, मानसिक दबाव आणि नकोसे राजकारण या बाबींनीसुद्धा भारताच्या पराभवाची कथा लिहिण्यात योगदान दिले. भारतीय क्रिकेट विचित्र वळणावर उभे असल्याचे मान्य करून ‘यही समय है, सही समय है’ म्हणत, कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. ‘रुकना, टिकना और जूझना’ ही द्रविड-लक्ष्मणची त्रिसूत्री भारतीय संघाचा दबदबा परत निर्माण करू शकेल.