अग्रलेख
raj thakare व्यक्ती, समाज, सरकार किंवा कोणत्याही यंत्रणांच्या कार्यकाळातील शांततेचा काळ हा त्यांच्यासाठी सर्वाधिक कसोटीचा काळ असतो असे म्हणतात. सारे काही स्वस्थ आहे, आश्वस्त आहे, कोणत्याही प्रकारच्या चिंतेचे, काळजीचे किंवा सावधगिरीचे कोणतेही कारण नाही, असा निर्धास्ततेचा काळ म्हणजे शांततेचा काळ असला, तरी तो सुस्ततेचा काळ नसतो. लष्करासारख्या यंत्रणा केवळ युद्धकाळातच सतर्क आणि कार्यमग्न असतात असा सर्वसाधारण समज असतो. पण तो संपूर्ण खरा नाही. उलट, शांततेच्या काळात लष्करे अधिक कार्यमग्न असतात. या काळात लष्कर केवळ युद्धाची वाट पाहात स्वस्थ बसत नाही. उलट हा काळ लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात भविष्यातील रणनीतीची आखणी, त्या दृष्टीने सैन्याचे प्रशिक्षण, सैनिकांची मानसिक मशागत, तांत्रिक बाबींची पूर्तता, नव्या युद्धनीतीचा अभ्यास, नव्या शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव आणि प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानंतर करावयाच्या कृतींचा सराव अशा अनेक गोष्टी जेव्हा शांततेच्या काळात सातत्याने केल्या जातात, तेव्हा प्रत्यक्ष युद्धकाळात हे सैन्य सक्षमपणे त्यास सामोरे जात असते.
पण, सर्वांनाच शांततेच्या काळात व्यस्त राहण्याचे महत्त्व माहीत असते असे मात्र नाही. शांततेच्या काळात करण्यासारखे काहीच नसते हीच ज्यांची समजूत असते, ते सर्व जण सुस्तावलेलेही असतात आणि युद्धभूमीवर उतरण्याची वेळ आली की त्यांना खडबडून जाग येते, शांततेच्या काळातील सुस्ती उतरली तरी प्रत्यक्ष कृतीच्या काळात काय करावे हे सुचेनासे होते आणि घाईगडबडीत जे काही सुचेल ते करण्याची वेळ येते. त्याच्या परिणामांची कल्पनाही नसताना काहीतरी करावे एवढेच ज्यांना माहीत असते, त्यांचा ‘ठाकरे’ होतो असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांच्या राजकारणातील बराचसा काळ हा सुस्ततेचाच होता. म्हणजे, निवडणुका आल्या की त्यांचा पक्ष हातपाय हलवू लागतो आणि त्या काळात जे काही राजकारण करण्याची संधी समोर चालून येईल, त्यावर झडप घालण्याचे राजकारण केले जाते असाच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास दिसतो. म्हणूनच, शांततेच्या काळात सुस्त आणि निवडणुकांच्या काळात व्यस्त असा त्यांचा खाक्या असतो. मुळात, ठाकरे परिवाराची आजची पिढी हीच अपघाताने राजकारणात उतरलेली पिढी असल्याने, त्यांच्या राजकारणाचा बाजही वातकुक्कुटासारखाच आहे. म्हणजे, वाऱ्याच्या दिशेने पाठ फिरवायची आणि त्याच दिशेने बांग द्यायची असा बाज या कुटुंबातील या पिढीच्या राजकारणाने स्वीकारला आहे. केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा वारसा एवढीच त्यांच्या राजकारणाची पुंजी असल्याने, चालून आलेले नेतृत्व एवढीच त्यांची कमाई आहे. या संधीचा नेमका फायदा उठविण्यासाठी त्यांनी काही मोठे कर्तृत्व दखविल्याचा ठोस पुरावा तर नाहीच, उलट, बाळासाहेबांची पुण्याई पाठीशी नसती तर आपण शून्यवत आहोत, ही जाणीवही त्यांना आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे काही वेळा कबूलही केले आहे. राज ठाकरे यांच्याही पाठीशी बाळासाहेबांचीच पुण्याई असली तरी नेतृत्व सिद्ध करण्याची संधी त्यांच्यासमोर अनेकदा उभी राहिली होती. मुळात आपले व्यक्तिमत्त्व आता जे दिसते तसेच आहे, की याहून वेगळे आहे, आपले नेतृत्व खरे आहे की बेगडी आहे याविषयी त्यांच्याही मनात काहीसा संभ्रम असावा, असेही दिसून आले आहे. ‘मला अस्सल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका’ असा एक सज्जड इशारा त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्याच कार्यकर्त्यांना दिला होता.raj thakare तेव्हापासून ते ज्या रूपात वावरत आहेत, ते खरे राज ठाकरे, की त्यांचे याहून काही वेगळे रूप आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसही उमगलेले नाही. म्हणूनच, राजकारणाच्या रणांगणात उतरण्याची वेळ आली की हाती येईल ते शस्त्र परजून सिद्ध होण्याची वेळ त्यांच्यावर वारंवार येते असे वारंवार स्पष्ट झालेले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा वारसा म्हणून या बंधूंच्या हातात मिळालेले एक असेच शस्त्र आता निवडणुकांच्या रणधुमाळीत त्यांनी परजले आहे. काही शस्त्रांचा वापर केला नाही तर त्यांना गंज चढतो. त्यांची धारही कमी होते आणि अशी बोथट शस्त्रे हवेत फिरवावी लागली तर त्यांचा उपयोगही होत नाही. याआधी त्यांनी अनेकदा ते हवेतच चालवलेले असल्याने त्या शस्त्राचा प्रभावही फारसा राहिलेला नाही. पण ऐनवेळी, शांततेच्या काळात भावी संघर्षाच्या तयारीसाठी कार्यमग्न राहण्याऐवजी हाती असलेल्या हत्याराच्या भरवशावर मैदानात उतरण्याच्या विश्वासामुळे त्यांनी पुन्हा तेच शस्त्र हवेत फिरविण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेचा मुद्दा मराठीजनांच्या गळी कोणा राजकीय नेत्यांनी उतरवावा, एवढी मराठी माणसाची मानसिकता खचीतच सुस्तावलेली नाही. मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, हे तमाम मराठीजनांस पक्के ठावूकआहे आणि त्याबाबतीत त्याची अस्मिता सदैव जिवंत आणि धगधगतीदेखील राहिलेली आहे. मराठीच्या संरक्षणासाठी राजकारणाहूनही प्रभावीपणे काम करणारी अन्य क्षेत्रे महाराष्ट्रात सतत कार्यरत असतात आणि शांततेच्या काळातही त्यावर त्यांचे काम सुरू असते, हेही सिद्ध झालेले आहे. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी साहित्यक्षेत्र सजग असते, मराठीचे अभ्यासक जागरूक असतात. त्यामुळे, ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा उचलण्याआधीच कोणी तो राजकारणाच्या रणांगणावर केंद्रस्थानी आणून ठेवतो व ठाकरे बंधू केवळ या मुद्याचे आपल्या हातातील गुळगुळीत हत्यार परजून, अगोदरच जागे असलेल्या मराठीजनांस जागे राहण्याचा इशारा करू लागतात, हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे, विचारांचा वारसा म्हणून हाती आलेला हा मुद्दा केवळ निवडणुकांपुरता वापरून अगोदरच जागे असलेल्या मराठीजनांस जागे करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांतील गांभीर्य आता संपले आहे. विचारांचा वारसा म्हणून या बंधूंच्या हाती असलेल्या आणखी एका मुद्याचे हत्यार वारंवार हवेत फिरवून त्यांनी या गंभीर मुद्याची धारही संपवून टाकली आहे. बॉम्बेचे मुंबई आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ही त्यांची आवडती रणनीती आहे. प्रत्येक निवडणुकांच्या तोंडावर त्याची आवई उठविली जाते आणि त्या मुद्याभोवती निवडणूक फिरविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. मुळात, गेल्या अनेक दशकांपासून हाच मुद्दा वारंवार उठविला गेल्याने व तसे काहीच होणार नसल्याची ग्वाही आताच्या व याआधीच्या प्रत्येक सरकारने दिलेली असल्याने, हा मुद्दादेखील आता गुळगुळीतच झाला आहे. मराठी माणसाला जागे करण्यासाठी आपण राजकारण करतो, असा त्यांचा असाच एक समज आहे. पण मुळात मराठी माणूस त्यांच्या राजकारणामुळे नव्हे, तर त्याच्या परंपरा, अस्मिता आणि जाणिवांमुळे सतत जागाच राहिलेला आहे. म्हणूनच, तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याबाबतच्या मुद्यावर ठाकरे बंधूंच्या अगोदरही, मराठीप्रेमींनी त्याविरोधात संघर्ष सुरू केला होता. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची आवई हा कपोलकल्पित राजकारणाचा भाग आहे हे माहीत असूनही, जेव्हा जेव्हा ही आवई उठविली जाते तेव्हा तेव्हा त्याचे निःसंदिग्ध निराकरण केले जाते, त्याचे कारणदेखील मराठी माणूस जागा आहे हेच आहे. असा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रात सहन होणार नाही आणि या मुद्याचे राजकारण करणाèयांच्याही अगोदर मराठी जनता त्याविरोधात संघर्षास सिद्ध होईल याची पुरेपूर साक्ष इतिहासाने देऊन ठेवलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष हा त्या जाणिवेचाच आविष्कार होता. त्यामुळे, मुळातच जागा असलेल्या मराठी माणसास जागे राहण्याचे इशारे निवडणुकीच्या राजकारणात चालणार नाहीत. राजकारण करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो, उशिरापर्यंत झोपून चालत नाही असा एक खोचक इशारा एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने राज ठाकरे यांनाच दिला होता. राज ठाकरे हे फावल्या वेळातील राजकारणी आहेत, असा तेव्हापासून महाराष्ट्रातील अनेकांचा समज आहे. म्हणूनच, जे नेते पूर्णवेळ राजकारण करत नाहीत, शांततेचा काळ सुस्ततेत घालवितात, जे स्वत:च झोपून राहतात, त्यांनी इतरांस जागे राहण्याचा सल्ला देणे हाच एक विनोद असतो. राजकारणात असे विनोद घडतच असल्याने तेदेखील आता गुळगुळीत होऊन गेले आहेत.