नफा झाल्याने कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना ‘लंडन वारी’ भेट!

28 Nov 2025 12:52:39
चेन्नई,
Visit to London for employees कंपनीला आर्थिक वर्षात चांगला नफा झाल्यानंतर साधारणपणे कर्मचारी बोनसच्या स्वरूपात रक्कम दिली जाते. मात्र, याच नफ्यावर एका कंपनीने असा वेगळा निर्णय घेतला आहे की त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. रक्कम देण्याऐवजी कंपनीने आपल्या मेहनती कर्मचाऱ्यांना थेट लंडन सफरीची भेट दिली आहे. बातमी समोर येताच नेटकऱ्यांनीदेखील कौतुकाचा वर्षाव केला असून, "या कंपनीत जॉब कुठे मिळेल?" असे प्रश्नदेखील विचारू लागले आहेत.
 
 
london tour
कामाचे तास वाढवण्याबाबत चर्चेच्या पार्श्वभूमीवर एखादी संस्था एवढ्या उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करते, हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘कॅसाग्राऊंड’ या कंपनीने हा निर्णय घेतला असून, या परदेश सहलीसाठी कर्मचाऱ्यांना एकाही रुपयाचा खर्च करावा लागणार नाही. वार्षिक नफ्यातून ठरवलेल्या शेअर बोनस योजनेंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी अशा सहलीवर नेण्याची कंपनीची पद्धत आहे.
 
कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष अरुण एमएन यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांची मेहनत, त्यांचे स्वप्न आणि प्रयत्न यांच्यामुळेच कंपनी आज या उंचीवर पोहोचली आहे. त्यामुळे हे यश त्यांच्या आनंदासह साजरे होणे आवश्यक आहे. "ही परंपरा फक्त सहलीची नाही, तर आमच्या संस्थेची कार्यसंस्कृती आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीतील अनेकांसाठी ही पहिलीच परदेशवारी आहे आणि त्यांचा अनुभव संस्मरणीय होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून यासाठी वेगळी टीम काम करत असून, कर्मचारी गटागटाने लंडन दौर्‍यावर जाणार आहेत. त्यांना शहरातील पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे आणि विशेष उपक्रमांचा अनुभव देण्यात येणार आहे. यापूर्वीही कंपनीने तब्बल 6000 कर्मचाऱ्यांना लंडनवारी घडवून आणली आहे. त्यामुळे नफा वाढला की बक्षीससुद्धा वाढते—हे या संस्थेने प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच कंपनीची खरी कमाई असल्याचा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
Powered By Sangraha 9.0