काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेर शोधा

29 Nov 2025 05:30:00
दिल्ली अग्रलेख
gandhi family देशातील सर्वांत जुना वा म्हातारा काँग्रेस पक्ष शेवटचे आचके देत आहे, असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे असले तरी काँग्रेस पक्षावर आजही गांधी घराण्याचा रिमोट कंट्रोल चालतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खडगे हे नाममात्र आणि नामधारी अध्यक्ष आहेत, कर्नाटकातील सत्तासंघर्षात याची कबुली त्यांनी आपल्या तोंडाने दिली आहे. गांधी घराणे काँग्रेस पक्ष चालवत असला तरी त्यात सध्या अंतिम शब्द हा राहुल गांधी यांचा असतो. राहुलच्या आले मना तेथे कोणाचे चालेना, अशी सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती आहे. राहुल गांधी म्हणेल ती काँग्रेस पक्षात पूर्व दिशा असते. राहुल गांधींनी पश्चिम दिेशेला पूर्व दिशा म्हटले तरी काँग्रेसमधील सर्व नेते स्वत:चे डोके आणि अक्कल गहाण ठेवून पूर्व दिशेला पश्चिम दिशा म्हणत सुटतात. एवढेच नाही तर ती पूर्व कशी आहे, हे समोरच्याला पटवूनही देत असतात.
 
 


gandhi 
 
 
बरं ज्या राहुल गांधींची काँग्रेसमधील सर्व नेते जीहुजुरी करतात, त्या राहुल गांधी यांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व असाधारण आहे, असेही नाही. ते अतिशय साधारण आणि कोणताही वकूब नसलेले आहे. काँग्रेस पक्षात आजवर अनेक अध्यक्ष होऊन गेले, पण त्यांचासारखा अकार्यक्षम आणि कर्तृत्वहीन अध्यक्ष आजपर्यंत दुसरा कोणी झाला नाही. काँग्रेस पक्षातील सर्वांत अयशस्वी नेता असे त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे देशातील जनतेचाच नाही तर काँग्रेस पक्षातील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचाही राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून विश्वास उडत आहे. नेता तो असतो, जो पक्षामध्ये चैतन्य निर्माण करतो, नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि विजयाची जिद्द निर्माण करतो. पक्षाला निवडणुका जिंकून देतो. पण यातील एकही काम राहुल गांधी आजपर्यंत करू शकले नाही. काँग्रेस पक्षाला एकही निवडणूक जिंकून देऊ शकले नाही. लोकसभा आणि विधानसभा सोडा, पण साधी ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूकही राहुल गांधी काँग्रेस पक्षाला जिंकून देऊ शकले नाही. पक्षाला निवडणूक जिंकून देणे तर दूर पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाèया अमेठी मतदारसंघात त्यांचाच पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविरुद्ध आवाज उठवणे सुरू केले आहे. त्याची सुरुवात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी केली. काँग्रेसचे नेतृत्व प्रियांका वढेरा यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी अल्वी यांनी करत सर्वांना धक्का दिला. एकप्रकारे त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची मागणी केली आहे. कारण जो नेता पक्षाला निवडणूक जिंकून देतो, तोच खरा नेता असतो. एखाद दुसèया निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला तर समजण्यासारखे असते.gandhi family पण त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष एकही निवडणूक जिंकला नाही. 2014 पासून लोकसभेच्या तीन तर विविध राज्यांतील आतापर्यंतच्या 95 विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. पुढील दोन वर्षांत राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शतक गाठले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या एका मुद्यावर राहुल गांधी आणि सचिन तेंडुलकर यांची बरोबरी होते. म्हणजे सचिन तेंडुलकरने सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे केले, तसेच राहुल गांधी पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शतक साजरे करण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावरून काँग्रेस नेत्यांचा विश्वास उडत चालला आहे. काँग्रेस पक्षाला बुडत्या जहाजाचे स्वरूप आले आहे. काँग्रेस पक्षरूपी जहाज अजून पूर्णपणे बुडाले नसले तरी ते गटांगळ्या खात आहे. कोणत्याही क्षणी त्याला जलसमाधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गांधी घराणेच आपले आणि काँग्रेस पक्षाचे तारणहार असल्याचे काँग्रेस पक्षातील नेत्यांना अजूनही का वाटते, हा अनाकलनीय प्रश्न आहे. एकेकाळी गांधी घराण्याच्या पुण्याईवर काँग्रेस पक्ष वाढला, सत्तेवर आला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही. 2014 नंतर देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतर तर परिस्थितीत झपाट्याने बदल झाला. त्यातही काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडून राहुल गांधी यांच्याकडे आल्यानंतर तर काँग्रेसचा èहास सुरू झाला. गेल्या 11 वर्षांपासून काँग्रेसची घसरण सुरू आहे, जी राहुल गांधी यांना सावरता आली नाही. मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाच्या झंझावातात राहुल गांधी यांचा पालापाचोळाच नाही तर पार कचरा झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबद्दल पक्षात चर्चा सुरू झाली. रशीद अल्वीसारखे नेते आता जाहीरपणे बोलू लागले. अल्वी खुलेआम बोलत असले तरी ती त्यांची एकट्याची नाही तर काँग्रेस पक्षातील बहुसंख्य नेत्यांची भावना आहे. कारण कोणीही हारणाèया घोड्यावर पैसे लावत नाही. काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांची स्थिती हारणाèया घोड्यासारखी झाली आहे.
रशीद अल्वी यांनी राहुल गांधींना काँग्रेसच्या नेतृत्वपदावरून पायउतार होण्याची सूचना आणि प्रियांका वढेरा यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची मागणी केली आहे. रशीद अल्वी यांच्या पहिल्या सूचनेशी सर्व जण सहमत असले तरी दुसèया सूचनेशी किती जण सहमत होतील, याबद्दल शंका आहे. प्रियांका वढेरा इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात, त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोपवावे, अशी अल्वी यांची सूचनावजा मागणी आहे. आतापर्यंत प्रियांका वढेरा या काँग्रेस पक्षासाठी झाकली मूठ सव्वा लाखाची होत्या. पण मागील काही निवडणुकीत त्यांच्याही नेतृत्वाचा फुगा फुटला. आपल्या नेतृत्वाचा करिश्मा त्या दाखवू शकल्या नाहीत. या देशातील मतदार आता शहाणा झाला आहे. नेत्याच्या चेहèयाकडे पाहून, वा चेहरा किती स्मार्ट आहे, कोणासारखा दिसतो, हे पाहून तो मतदान करत नाही. तर कोण देशाचे कणखरपणे नेतृत्व करू शकतो, देशाला प्रगतिपथावर नेऊ शकतो, विकासाच्या मार्गावर उभा करू शकतो, हे पाहून मतदान करत असतो. उगीच सलग तीन लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला निवडून दिले नाही.
काँग्रेस महासचिव म्हणून प्रियांका वढेरा यांना उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रभारी करण्यात आले होते. उत्तरप्रदेश काँग्रेसचे सर्वाधिकार त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पण त्या उत्तरप्रदेशात काँग्रेसची लाज वाचवू शकल्या नाहीत. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे पानिपत झाले. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व प्रियांका यांच्याकडे सोपवल्याने फार काही फरक पडेल, असे वाटत नाही. राहुल गांधी मोठे शून्य असतील तर प्रियांका या छोटे शून्य आहेत. शून्याचा आकार लहान असो वा मोठा त्याने फार फरक पडत नाही, असते ते फक्त शून्यच.
त्यामुळे काँग्रेस टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी गांधी घराण्याबाहेर काँग्रेसचे नेतृत्व शोधले पाहिजे, गांधी घराण्याच्या बाहेरील नेत्याकडे काँग्रेसचे नेतृत्व सोपवले पाहिजे. गांधी घराण्याच्या बाहेरचा नेता काँग्रेसचा फार फायदा करू शकला नाही तरी नुकसानही करणार नाही. कारण काँग्रेस पक्षाने नुकसानीची कमाल मर्यादा राहुल गांधींच्या नेतृत्वात कधीच गाठली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात आता नुकसान होण्यासारखे काही उरले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष वाचला पाहिजे, टिकला पाहिजे, असे काँग्रेसच्या नेत्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षातून गांधी घराण्याला बाहेर केले पाहिजे, इटलीत पाठवले पाहिजे. तसेही राहुल गांधी गरज असताना काँग्रेस पक्षाला वाèयावर सोडत वारंवार परदेशात जात असतात. त्यामुळे काँग्रेसने एकदा हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही, यातच त्यांचे हित आहे.
Powered By Sangraha 9.0