वेध...
family system आज एका वृत्तपत्रातील बातमी वाचण्यात आली. त्यातील घटना भारतातील नसली तरी, भारतात तशी घटना घडू नये, असे वाटते. या बातमीत म्हटल्याप्रमाणे लंडनमधील एका जोडप्याच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस डिसेंबरमध्ये आहे. हे जोडपे एकाच छताखाली राहत असले तरी त्यांचे एकमेकांशी संबंध काही आवश्यक गरजेपुरतेच आहेत. त्यांच्या नात्यात एकमेकांबद्दल स्वारस्य उरलेले नाही. कामाच्या ठिकाणावर क्वाईट क्विटिंग, म्हणजे कोणतेही कारण न सांगता कामातून अनासक्ती, असाच व्यवहार पाश्चिमात्य देशांमधील अनेक जोडपी आता नात्यांमध्ये दाखवत आहेत. याला शांततेत घेतलेला काडीमोड, असे म्हटले जाते.
यात जोडपी एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या वेगळी होतात. ते एकमेकांशी कोणताही संवाद ठेवत नाहीत किंवा एकमेकांपासून कोणतीही अपेक्षा बाळगत नाहीत. न्यायालयात जाऊन घटस्फोट न घेता एकत्र राहणे, अशी जोडपी अनेक वर्षे एकत्र राहू शकतात. केवळ मुलांमुळे घटस्फोट घेऊ शकत नाहीत. दोघांपैकी एकाची आर्थिक स्थिती कमकुवत असणे किंवा दुसèयावर अवलंबून असणे, अशा परिस्थितीमुळे न्यायालयात जाऊन घटस्फोट घेणे टाळून क्वाईट डिव्होर्स स्वीकारला जात आहे. यावरून मला हिंदी हास्य कवी सुरेंद्र शर्मा यांनी एका कार्यक्रमात सांगितलेला विनोद आठवतो. त्यांनी म्हटले होते की, माझ्या लग्नाचा 50 वा वाढदिवस आम्ही साजरा केला. अमेरिकेत असतो तर, 50 व्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असता. कारण, अमेरिकेत नवरा-बायको रस्त्यावर, बागेत, रेल्वेत, कारमध्ये कुठेही आणि वेळ मिळेल तेव्हा, प्रेम करतात. त्यामुळे त्यांचा प्रेमाचा कोटा लवकर पूर्ण होतो. त्यामुळे ते पटापट जोडीदार बदलतात. तर, भारतीय नवरा-बायकोला प्रेम करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांचा प्रेमाचा कोटा पूर्णच होत नाही. त्यामुळे ते अनेक वर्षे सोबत राहतात. नवरा-बायकोचे भांडण झाले तर, बायको म्हणते की, मी तुम्हाला कधीचीच सोडून गेली असती पण, मुलांमुळे तसे करणे मला शक्य झाले नाही. याचा अर्थ भारतीय नवरा-बायकोे रेल्वे रुळाप्रमाणे असतात. सोबत चालतात पण, एकमेकांना भेटत नाहीत. तर, मुले त्यांच्यामधील स्लिपरचे काम करतात. नवरा-बायकोचे पटो अथवा न पटो पण, सोबत चालावेच लागते. भारतीय लोक पाश्चिमात्य संस्कृतीचे जाणते अजाणतेपणी अनुकरण करतात. त्यामुळे आपल्या देशात हा ट्रेंड येऊ नये, असे वाटते. भारतात एकत्र कुटुंबपद्धती आहे. त्याचे प्रमाण हल्ली कमी होत असले तरीही आजही अनेक कुटुंबे एकत्र राहतात. एकत्र कुटुंंबपद्धतीमध्ये परिवारात कोणीतरी एक वडील किंवा ज्येष्ठ व्यक्ती असते. तिच्या आदेशाचे सर्व सदस्य पालन करतात. कुटुंबात काही वाद झाल्यास ती ज्येष्ठ व्यक्ती वाद झालेल्या दोघांचीही समजूत काढून प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांच्यातील वाद मिटविला जातो. या उलट पाश्चिमात्य देशांमध्ये मुले ठरावीक वयानंतर घराबाहेर पडतात. स्वत: काही नोकरी, कामधंदा करून पैसे कमवितात, शिकतात, मित्र, मैत्रिणीसोबत रिलेशनशिपमध्ये राहतात. तसेच, कोणी कोणाला भेटायला एकमेकांच्या घरी अथवा बाहेर भेटायचे असल्यास अगोदर अपॉईंटमेंट घ्यावी लागते. अशी स्थिती भारतात नाही. भारतीय मुले-मुली शिक्षण होईपर्यंत आई-वडिलांसोबतच राहतात. बहुतांश मुलांचे लग्न झाल्यावरही ते आई-वडिलांसोबतच वास्तव्य करतात. मात्र, अलिकडच्या काळात मुले-मुली शिक्षण, नोकरीनिमित्ताने पुणे, मुंबई, बंगलोर इत्यादी मोठ्या शहरांमध्ये जात आहेत. तर, काही परदेशातही जात आहेत. तिकडे गेलेल्या मुलांकडून किंवा नोकरीच्या ठिकाणी विदेशात राहून आलेल्या मुला-मुलींच्या संपर्कात आलेल्या मुलांकडून पाश्चिमात्य देशातील संस्कृतीचे अनुकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.family system भारतीय संस्कृती टिकून राहण्याचे मूळ कारण, भारतीय कुटुंब व्यवस्था हे आहे. कुटुंबात मुला-मुलींवर जे संस्कार होतात किंवा केले जातात, ते जीवनभर त्यांच्यासोबत असतात. तेव्हा, कुटुंब व्यवस्था टिकावी, कुटुंबात सर्व सदस्यांमध्ये संवाद असावा, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना कायम असावी. तेव्हा, भारतीय संस्कृती टिकण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती टिकणे अतिशय आवश्यक आहे.
विजय कुळकर्णी
8806006149