ही तर रामराज्याची नांदी...

    दिनांक :29-Nov-2025
Total Views |
beginning of ram rajya जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भगवान श्रीरामांच्या जन्मभूमी मंदिरात प्रभू रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मध्वज फडकवण्यात आला. हा सोहळा अभिजित मुहूर्तावर म्हणजेच सकाळी 11.45 ते दुपारी 12.29 दरम्यान संपन्न झाला. हा ऐतिहासिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ध्वजारोहण केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित होते. सुमारे पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, असंख्य बलिदानानंतर हा क्षण पाहायला मिळाला आहे, हे आपल्या पिढीचं भाग्य आहे. माउली म्हणतात, ‘‘रुप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी’’ विठ्ठलाचं दर्शन झालं आणि सुखाशी नातं जडलं. हे सुख कशामुळे प्राप्त झालं तर, अनेक जन्मांपासून जे सत्कर्म केलं, त्यामुळे हे सुख प्राप्त झालं आहे. मी अतिशय खात्रीने सांगू शकतो की जसा आनंद माउलींना विठ्ठलाचं रूप पाहिल्यावर झाला, तसा आनंद आज प्रत्येक हिंदूला झाला असावा. हा क्षण, हा सोहळा पाहण्यासाठी आपण जिवंत राहिलो, हे काय कमी आहे! काही वर्षांपूर्वीच कोरोनाचं संकट आलं आणि यात आपण आपले जिवलग, नातलग, मित्रवर्य गमावले.
 

रामराज्य  
 
 
मात्र आपण बचावलो तो हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी... इतिहास साक्षी आहे की, इस्लामी जिहादी आक्रमकांनी श्रीराम जन्मभूमीवरील मूळ मंदिर उद्ध्वस्त केले. औरंगजेबासारख्या अतिरेक्यांनी त्या जागी बाबरी नावाची रचना उभी केली. पण मंदिर तोडले तरी श्रद्धा तोडता येत नाही, हे त्या अतिरेक्यांना कळलंच नव्हतं. भारताची समाजरचनाच अद्भुत आहे. ज्या विस्तारवादी पंथांनी अर्ध्याहून अधिक जग आपल्या पंथाचं केलं, त्या पंथांना भारत पूर्णपणे बाटवता आला नाही. त्या पंथांना भारताच्या संस्कृतीचा नायनाट करता आला नाही. याचं कारण आपल्या मनात वसलेला राम आहे.
श्रीराम हे केवळ दैवत नाही. तर ती भारतीयांच्या जीवनाची शैली आहे. हा भारतीयांचा आत्मा आहे. हा श्वास आहे. हनुमंत ज्याप्रमाणे आपली छाती फाडून त्यात रामाचं अस्तित्व असल्याचं दाखवतो. ही कथा रुपक आहे. हनुमंत हा हिंदूंचं प्रतीक आहे. हनुमंताप्रमाणे प्रत्येक हिंदूच्या हृदयात राम आहे. म्हणून प्रत्येक हिंदू म्हणजे रामाचं जणू एक मंदिर आहे. या हाडामांसाच्या देहात प्रभू श्रीराम राहतात. ही आपली भावना आहे. म्हणूनच आपला समाज, आपली संस्कृती नष्ट होऊ शकली नाही. पाचशे वर्षे हिंदूंनी जन्मभूमीची जागा सोडली नाही. कोर्टात लढले, रस्त्यावर उतरले, बलिदान दिले. रामजन्मभूमी मुक्तीसाठी कारसेवकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 1990 मध्ये मुलायमसिंग सरकारने कारसेवकांवर गोळ्या झाडल्या, तरी हिंदू मागे हटला नाही. हजारो हिंदूंनी आपल्या शरीराची समिधा करून या यज्ञात आपले सर्वस्व अर्पण केले. ते बलिदान व्यर्थ गेले नाही. आणि मग आला तो क्षण - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराच्या निर्मितीला गती दिली. अवघ्या काही वर्षांत भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं. 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: प्राणप्रतिष्ठा केली आणि मंदिराच्या गाभाèयात रामललांची मूर्ती विराजमान झाली. आता राम मंदिराच्या कळसावर धर्मध्वज फडकला. मोदींनी थरथरत्या हातांनी ध्वजाला प्रणाम केला. डाव्यांनी, जिहादी वृत्तींनी मोदींची थट्टा केली. पण ते हात वयामुळे थरथरत नव्हते. आपला जन्म राम-कर्मासाठी कामी आला, ही कृतज्ञता त्या थरथरत्या हातात होती... शबरीने असंख्य वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ज्यावेळी पहिल्यांदा रामाचं दर्शन केलं असेल, तेव्हा तिचेही हात थरथरले असतील. तिच्याही शरीरात कंपन उठलं असेल. तिच्या नयनांतून गंगा यमुना वाहिल्या असतील. या भावना शहरी नक्षलींना नाही कळणार, या भावना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना नाही कळणार, या भावना दळभद्री मनाच्या लोकांना नाही कळणार. या भावना समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला हिंदू व्हावं लागेल, राममय व्हावं लागेल. कदाचित तुम्ही जन्माने हिंदू नसाल पण भावनेने हिंदू व्हावं लागेल.beginning of ram rajya हा भाव आपल्याला ज्ञानेश्वर माउलींच्या मूर्तीत दिसतो, हा भाव आपल्याला तुकोबांच्या तसबिरीत दिसतो, हा भाव आपल्याला समर्थ रामदासांच्या प्रत्येक ओळींमध्ये दिसतो, हा भाव आपल्याला कबीराच्या भक्तीत दिसतो. हा भाव या दानवांना कसा कळेल?
आपला धर्मध्वज फडकला आणि संपूर्ण विश्वाला एकच संदेश दिला गेला - ज्यांनी ज्यांनी आमचा धर्म दडपण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता हे कळलं पाहिजे की तुमची जिहादी मानसिकता, मिशनरी कटकारस्थाने, तुमची डावी आक्रमणे किंवा धर्मांतराचे षडयंत्र यापैकी कशानेही हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला किंचितही इजा होणार नाही. उलट ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रावणाचा अंत केला त्याप्रमाणे हिंदू तुमचे सगळे डाव उद्ध्वस्त करतील आणि अविरत ध्वज फडकवत ठेवतील. या आनंदाच्या क्षणीही काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. काँग्रेस, डावे, तथाकथित पुरोगामी आणि शहरी नक्षली बुद्धिजीवी धर्मध्वजाची थट्टा करतायत. म्हणतायत, ‘‘हा मध्ययुगाकडे परतण्याचा प्रयत्न आहे’’, ‘‘हा विज्ञानविरोधी डाव आहे’’, ‘‘हा असहिष्णुतेचा विजय आहे.’’ पण या साèयांचा दुटप्पीपणा फार भयंकर आहे. हे लोकच तर सतत गांधींचं नाव घेऊन म्हणतात, ‘‘गांधीजी रामाचे भक्त होते, ते रोज रामाचे भजन गायचे, शेवटच्या क्षणी देखील त्यांनी ‘हे राम’ म्हटलं’’. पण ज्या रामाचे गांधीजी भजन गायचे, त्या रामाचंच मंदिर आणि त्या रामाचाच धर्मध्वज या लोकांना नकोय! म्हणजे एकीकडे गांधींच्या नावाचा वापर करायचा आणि दुसरीकडे रामाला नावे ठेवायची? हा दुटप्पीपणा आता हिंदू जनतेने ओळखला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल या शुभ प्रसंगी या दानवांचा उल्लेख का करता? अहो, आपला सणही रावण दहन केल्यानंतरच साजरा होतो की नाही? आता धर्मध्वज फडकला आहे, याचा अर्थ असा की भारताला पुन्हा ते जुने वैभव प्राप्त होण्याचा क्षण जवळ आला आहे. प्रभू श्रीरामांच्या कृपेने भारत पुन्हा एकदा महासत्ता होईल. नारायण आले की त्यामागून लक्ष्मी येणारच! आता खऱ्या अर्थाने रामराज्याची नांदी सुरू झाली आहे. पुढची 20-25 वर्षे म्हणजे 2047 पर्यंत आपण विकसित भारत घडवणार आहोत, हा ध्यास सर्वांनीच मनात ठेवला पाहिजे. आपल्यातील जातिवाद, प्रांतवाद, भाषावाद मिटवून भारताला बलशाली करण्याचा ध्यास घेतला पाहिजे. जातिवाद, प्रांतवाद, भाषावादाच्या दलदलीत ढकलणाèया पुढाऱ्यांवर मतपेटीतून हल्लाबोल करून हद्दपार केलं पाहिजे. कारण भारत आर्थिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या, तंत्रज्ञानात, विज्ञानात अतुलनीय शक्तिशाली करायचा असेल तर आपल्यातील भेद हीच खूप मोठी अडचण आहे. म्हणून हा भेद नकोय... या आधुनिक भारताची मुळे ही हिंदूभूमीच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीत, सनातन धर्मात घट्ट रुजलेली आहेत. रामराज्य म्हणजे केवळ रामाचं भजन गाणं नव्हे; तर रामराज्य म्हणजे न्याय, समरसता, सुशासन, आत्मनिर्भरता, वैज्ञानिकता आणि संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श असलेलं राज्य होय! ते राज्य आता दूर नाही. हा फडकणारा धर्मध्वज म्हणजे एक संकल्प आहे. हिंदू सभ्यतेला पुन्हा जागृत करण्याचा संकल्प. पाचशे वर्षांपूर्वी मंदिर पाडलं होतं, पण आज मंदिर उभं राहिलं आणि त्यावर धर्मध्वज फडकला. यापुढे कोणत्याही आक्रमकाला, कोणत्याही धर्मांधाला, कोणत्याही दुटप्पी राजकारण्याला हे विसरता येणार नाही की ही भूमी रामाची आहे, ही भूमी कृष्णाची आहे, ही भूमी शिवाची आहे. ही हिंदूंची भूमी आहे आणि या भूमीवर आता पुन्हा रामराज्य येत आहे.
जय श्रीराम!
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री