काँग्रेसेचे ‘जवाब दो’ आंदोलन

03 Nov 2025 21:20:10
अमरावती,
Amravati अमरावती शहरातील कचर्‍याच्या समस्येने गंभीर रूप धारण केल्यानंतर अमरावती शहर काँग्रेस कमिटीने महापालिकेवर ‘जवाब दो!’ आंदोलन छेडले. या आंदोलनाच्या दबावामुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी येत्या काही दिवसांत कचरा माफियांवर गुन्हे दाखल करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
 
 
Amravati
अमरावती महापालिकेतील निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रभागनिहाय ठेके संपुष्टात आले. त्यानंतर झोननिहाय कचरा काढण्याच्या कंत्राटात सर्व नियम, अटी व शर्तींचा भंग करण्यात आला. विशेषतः तत्कालीन आयुक्तांच्या मार्फतीने मनुष्यबळाची अट मुद्दामहून काढून टाकण्यात आली. यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, कचरा माफियांना भ्रष्टाचारासाठी खुली दारे उघडली गेली. निविदा जाहीर झाल्यापासूनच काँग्रेस पक्षाने या विरोधात सातत्याने आवाज उचलला. पक्षाने वारंवार सांगितले की, मनुष्यबळाची अट काढणे हा षडयंत्राचा भाग असून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराला प्रोत्साहन देणारे आहे. मात्र प्रशासक राजवटीत काँग्रेसच्या आंदोलने, निवेदने व बैठका होऊनही स्थानिक लोकप्रतिनिधी व कचरा माफियांनी प्रशासकीय अधिकार्‍यांशी संगनमत करून ठेके मिळवले. यातून शहरातील १० लाख नागरिकांच्या आरोग्याला सतत धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या वारंवार आंदोलनानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६८ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी न्यायालयाने स्पष्ट सूचना दिली. परंतू या सूचनेनंतरही कचरा माफियांवर कोणतीही कारवाई झाली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने हे आंदोलन केले. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी महापालिकेवर ‘जवाब दो!’ आंदोलन करण्यात आले. कचरा माफिया हटाव, अमरावती बचाव, कचरा माफियांना संरक्षण देणार्‍या लोकप्रतिनिधींचा निषेध असो, जनतेच्या जीवाशी खेळणार्‍या प्रशासनाचा निषेध असो, कचरा माफियांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन सादर करून कचरा माफियांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावर आयुक्तांनी येत्या काही दिवसांत कचरा माफियांची योग्य विल्हेवाट लावून गुन्हे दाखल करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
Powered By Sangraha 9.0