अमरावती,
amravati mumbai flight गेल्या २६ ऑक्टोबरपासून मुंबई- अमरावती - मुंबई विमानसेवेच्या वेळेत झालेल्या बदलाचे प्रवाशांनी स्वागत केले असतानाच सोमवारी अमरावती विमानतळावरील विमानसेवेला धुक्यामुळे फटका बसला. बेलोरा येथील विमानतळावरून सकाळी ९.१५ वाजता होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. पूर्व सूचना देण्यात न आल्याने प्रवासी चांगलेच संतप्त झाले होते.
 
 
 
  
 
अमरावतीच्या विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमानसेवा रद्द करण्यात आल्याचे विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई - अमरावती - मुंबई या विमानसेवेच्या वेळेत बदल झाल्यानंतर विमानसेवा रद्द होण्याचा हा पहिलाच प्रसंग असला, तरी त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला. विमानसेवेच्या वेळेत गेल्या २६ ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे. ही विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली आहे. दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी ७.३० वाजता विमान मुंबईहून उड्डाण घेते आणि सकाळी ८.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहोचते. त्यानंतर परतीचे विमान सकाळी ९.१५ वाजता मुंबईकडे झेपावते आणि सकाळी १०.३० वाजता मुंबई विमानतळावर पोहचते. ही विमानसेवा आधी संध्याकाळी होती. ही वेळ दिवसभराच्या कामासाठी मुंबईला जाणार्या प्रवाशांसाठी गैरसोयीची असल्याने विमानाच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती, त्यामुळे विमान कंपनीने विमानसेवेच्या वेळेत बदल केला.amravati mumbai flight त्याचे प्रवाशांनी स्वागत केले आणि या विमानसेवेला प्रतिसाद देखील मिळाला. पण, सोमवारी सकाळी अमरावतीकडे निघालेले प्रवासी हे मुंबई विमानतळावर पोहोचले, तेव्हा त्यांना अचानक विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली. वेळेवर विमान रद्द झाल्याची सूचना मिळाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. सकाळी अमरावती विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे विमान उतरण्याची शक्यता नसल्याने मुंबईहून येणारे विमान रद्द करण्यात आले. विमान उशिरा आले असते, तर विमानाची इतर उड्डाणे रद्द करावी लागली असती, त्यामुळे अमरावतीकडे हे विमान झेपावलेच नाही, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या गोंधळात अमरावतीच्या प्रवाशांना आल्या पावली विमानतळावरून परतावे लागले. विमान ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईतील कामांचे नियोजन करणार्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला.