इस्लामाबाद,
Appreciation of Pakistan भारताच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर इतिहास रचला. पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत त्यांनी संपूर्ण देशाला अभिमानाने उंचावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी ५२ धावांनी शानदार विजय मिळवत ५२ वर्षांचा दीर्घ प्रतिक्षेचा शेवट केला. या विजयानंतर संपूर्ण देशभर जल्लोष उसळला. भारताच्या या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा म्हणाला, भारताने पुन्हा सिद्ध केले की ते जगातील सर्वात संतुलित आणि प्रबळ संघांपैकी एक आहेत. त्यांच्या संघात एकात्मता आणि आत्मविश्वास आहे. ते क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यातूनच अशा महान निकालांची निर्मिती होते. हा प्रत्येक तरुणासाठी एक प्रेरणादायक धडा आहे.
संग्रहित फोटो
तर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही भारतीय महिला संघाचे कौतुक केले. तो म्हणाला, भारतीय मुलींनी कमाल केली! त्यांनी विजय मिळवण्यासह क्रिकेटला नवी ऊर्जा दिली आहे. त्यांच्या खेळात व्यावसायिकता आणि आत्मविश्वास दोन्ही झळकले. टीम इंडियाने प्रत्येक क्षेत्रात संतुलित कामगिरी करून आपले सामर्थ्य दाखवले. भारतीय महिला क्रिकेट संघाचा हा विजय केवळ एका ट्रॉफीपुरता मर्यादित नाही. तो देशातील प्रत्येक तरुणीला प्रेरणा देणारा क्षण आहे. मेहनत, निश्चय आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय महिलांनी इतिहासाच्या पानांवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
या विजयात शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीचा मोठा वाटा होता. शफालीने ७८ चेंडूत जबरदस्त ८७ धावा ठोकल्या, तर गोलंदाजी करताना तिने अनुभवी सून लुस आणि मॅरिझन कॅपला परत पाठवले. मधल्या षटकांमध्ये सामना निर्णायक टप्प्यावर असताना दीप्ती शर्माने ५८ चेंडूत ५८ धावा झळकावल्या आणि नंतर पाच बळी घेत सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला. विशेष म्हणजे, तिच्या बळींमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्डचाही समावेश होता, जिने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारताने सात बाद २९८ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची संघ केवळ २४६ धावांवर आटोपली. वोल्वार्ड एका टोकाला ४१ व्या षटकापर्यंत लढत राहिली, पण दुसऱ्या टोकाला विकेटचा पडसाद सुरूच राहिल्याने धावगतीचा दबाव वाढत गेला आणि शेवटी भारतीय गोलंदाजांनी सामन्याचा शेवट शानदारपणे केला.