अमरावती,
acb custody ४१ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाचा कार्यकारी अभियंता रोहन पाटील याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमरावती विभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून तक्रारकर्त्यास बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रीकल काम देण्यात आले होते. या याबाबत तक्रारकर्ता अमरावती कार्यालयातील कार्यकारी अभियंता  रोहन पाटील यांना भेटण्याकरिता गेले असता, त्यांनी तीनही कामे एकूण १७  लाख ९४ हजार रुपयांचे होत असल्यामुळे २ टक्क्यानुसार ३५ रुपये द्या, आणि सोबतच बुलढाणा येथील जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामाचे कार्यादेश सुद्धा घेऊन जा, असे सांगितले.
 
 
  
 
 
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार नोंदविली. ४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित पडताळणी कार्यवाही दरम्यान कार्यकारी अभियंता रोहन पाटील यांनी तीन कामांचे २ टक्के प्रमाणे ३५ हजार रुपये व नव्या कामाच्या वर्क ऑर्डरचे ६ हजार रुपये अशी एकूण पंचासमक्ष ४१ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून रोहन पाटील यांना लगेच एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.acb custody त्याच्या विरोधात गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप,  अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे, पोलिस उपअधीक्षक मंगेश मोहोड, अमंलदार युवराज राठोड, वैभव जायले, चालक गोवर्धन नाईक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.