थंडीचा पत्ता नाही! नोव्हेंबरमध्येही मुसळधार पाऊस

03 Nov 2025 10:22:32
नवी दिल्ली,
Heavy rains even in November नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी देशात थंडीची चाहूल लागण्याऐवजी अनेक राज्यांत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मोठा अलर्ट जारी केला असून, दिल्लीसह उत्तर भारत, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि मध्य भारतातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात सोमवारी सकाळपासूनच आभाळ भरून आलं असून, काही भागांत हलक्या सरी पडल्या. दिवाळीपूर्वी हवामान कोरडे राहील, अशी अपेक्षा असतानाच अचानक पावसाने वातावरण बदललं आहे.
 
 
Heavy rains even in November
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम विक्षोभ सक्रिय झाल्याने उत्तर भारतात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात घसरण आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे दोन स्वतंत्र पट्टे निर्माण झाले असून, त्याचा परिणाम संपूर्ण देशभर जाणवतो आहे. यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान तज्ञांच्या मते, हा पाऊस हंगामी थंडीला आणखी काही दिवस विलंब लावू शकतो.
 
 
आता या पावसामुळे हवा थोडी स्वच्छ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अचानक तापमानातील बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांनाही विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतमाल साठवून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्ली प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि विजेच्या कडकडाटात सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तास देशासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
Powered By Sangraha 9.0