हिंगणघाटात विकास कामांचा इतिहास रचायचा : आ. कुणावार

03 Nov 2025 20:30:45
हिंगणघाट,
mla kunawar शहरातील भव्य दिव्य अशा सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन म्हणजे हिंगणघाटच्या सांस्कृतिक इतिहासातील हा मानाचा तुरा आहे. माझ्या कार्यकाळात किती कामं झाली हे महत्त्वाचं आहे. तालुयाच्या ठिकाणी होत नाहीत ती कामं होत आहेत. आपल्याला मतदार संघात विकास कामांचा इतिहास रचायचा असल्याचे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले. येथील संत तुकडोजी वार्ड परिसरात उभारण्यात येत असलेल्या राज्य शासनाच्या विशेष निधी अंतर्गत १७ कोटी रुपये निधीतून आज ३ रोजी सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी आ. समीर कुणावार बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार रामदास तडस, माजी नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, निलेश ठोंबरे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची उपस्थिती होती.
 
 

kunawar 
 
 
वना नदीवरील पूल व बंधारा बांधकाम तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणणे हे जसे आपल्यासाठी आगळे वेगळे क्षण होते तसेच हिंगणघाट येथे एक हजार आसन क्षमतेचे सभागृह बांधणे हे देखील स्वप्न होते असे आ. कुणावार म्हणाले. या कामासाठी पहिले १० कोटी आले नंतर सात कोटी आले. आता हे १७ कोटीचे काम होणार आहे. यासाठी आपल्याला चार वर्षे संघर्ष करावा लागला. मध्यंतरी मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संघर्षात याा कामाला उशीर झाला असेही ते म्हणाले. १० वर्षात हिंगणघाट शहरात १०० कोटी पेक्षा जास्त विकास निधी आपण खेचून आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी क्रीडा संकुलाची मागणी केली असता आ. कुणावार यांनी ती मागणीही लवकरच पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले. हिंगणघाट शहरातील बहुतांश कामं आटोपली आहेत. शहरात २४ तास पिण्याचे पाणी मिळावे हे आपले स्वप्न असल्याचे आ. कुणावार म्हणाले.
यावेळी माजी खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्ह्यातील पहिले सांस्कृतिक सभागृह देवळी येथे झाल्याचा उल्लेख करून ते सभागृह त्यावेळी ज्या मुख्याधिकार्‍यांच्या हातून उभारले गेले तेच प्रशांत उरकुडे सध्या स्थानिक पालिकेचे मुख्याधिकारी असल्याचा योगायोग असल्याचे म्हणाले.mla kunawar या सभागृहासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा गौरवाने उल्लेख केला. अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी क्रीडा वैभवाने संपन्न असलेल्या हिंगणघाट येथे क्रीडा संकुलाची गरज व्यत केली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांची यावेळी समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन अजय बिरे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमृता घारे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे वेळी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0