पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अश्रूंनी भारलेलं मैदान! भावनिक video

03 Nov 2025 11:15:24
नवी दिल्ली,
tears of South Africa भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2025 मध्ये इतिहास रचला आहे. सलग तीन पराभवानंतर जबरदस्त पुनरागमन करत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिलांनी रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी दणदणीत विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. या विजयाने भारतात जल्लोषाची लाट उसळली, पण या सामन्याच्या शेवटी मैदानावर एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यांत पाणी आणि भारतीय खेळाडू त्यांना धीर देताना दिसल्या.
 

tears of South Africa 
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने सामना गाजवला होता. तिने 98 चेंडूत 101 धावा ठोकत शतक झळकावलं, पण अखेरीस तिचं शतक व्यर्थ ठरलं. सामन्यानंतर ती मैदानावर शांतपणे बसलेली दिसली, तिच्या डोळ्यांत अश्रू होते. आफ्रिकन संघातील इतरही खेळाडू भावुक झाल्या होत्या. भारताकडून शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्माने फलंदाजीत चमक दाखवली. शेफालीने 78 चेंडूत 87 धावा करत दमदार सुरुवात दिली. मानधनाने 45, दीप्तीने 58, रिचा घोषने 34, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 तर हरमनप्रीतने 20 धावा केल्या. पहिल्या डावात भारताने 7 बाद 298 धावा उभारल्या.
 
 
 
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 52 धावांनी कमी पडला. दीप्ती शर्माने फिरकीच्या जादूने आफ्रिकन फलंदाजांना गारद केले. तिने 9.3 षटकांत 39 धावांत 5 विकेट्स घेत सामना भारताच्या झोळीत टाकला. शेफाली वर्मा आणि श्री चरणीने प्रत्येकी एकेक विकेट घेतली. 2005 आणि 2017 मध्ये हातातून सुटलेलं विश्वविजेतेपद अखेर 2025 मध्ये भारताने आपल्या नावावर केलं. भारतीय महिलांनी केवळ विश्वचषकच जिंकला नाही, तर जगभरातील प्रेक्षकांची मनंही जिंकली .
Powered By Sangraha 9.0