कोलकाता,
Trinamool A. Jyotipriya Malik पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय गदारोळ निर्माण करणारी घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्यावर रविवारी रात्री त्यांच्या सॉल्ट लेक येथील निवासस्थानी एका तरुणाने अचानक हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक दास असे या तरुणाचे नाव असून, तो अंदाजे ३० वर्षांचा आहे.
रात्री सुमारे नऊच्या सुमारास अभिषेक दास मलिक यांच्या घरात शिरला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या पोटात ठोसा मारत हल्ला केला. या अनपेक्षित प्रकाराने क्षणभर गोंधळ उडाला. मलिक यांनी आवाज दिल्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक आणि काही उपस्थित लोक तत्काळ घटनास्थळी धावून आले आणि आरोपीला पकडले. त्यानंतर त्याला विधाननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, चौकशी सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हाबरा भागातील रहिवासी आहे आणि त्याला आमदार मलिक यांच्याशी कामासंबंधी काही बोलायचे होते. मात्र, तो थेट घरात शिरून आक्रमक वर्तन करू लागल्याने परिस्थिती गंभीर बनली. ज्योतिप्रिया मलिक यांच्यावर झालेल्या या हल्ल्याने पुन्हा एकदा राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीच्या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.