मुंबई,
Anup Jalota भजनसम्राट म्हणून जगभरात ओळखले जाणारे ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांनी अलीकडील खास संवादात आपल्या संगीतप्रवासातील महत्त्वाचे अनुभव, जीवनशैली आणि वयाच्या 72व्या वर्षीही कायम असलेल्या ऊर्जा-रसिकतेबद्दल मनमोकळेपणाने बोलले. भजन, शास्त्रीय संगीत, मैफल, आरोग्य, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक जीवनातील घडामोडींवर त्यांनी दिलेली मते रसिकांना भावून गेली.
संगीताशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना जलोटा म्हणाले, “आजही मला मी 27 वर्षांचा वाटतो. कारण मी अजूनही तितक्याच एनर्जीने दोन-अडीच तास सलग गायन करू शकतो. तणाव माझ्या आयुष्यात नाही. तणाव माणसाच्या आनंदाचा नाश करतो; म्हणून मी त्यापासून दूर राहतो.” बालवयात सुरू झालेल्या गायनप्रवासाने दिलेली प्रेरणा आजही तितकीच ताजी असल्याचे त्यांनी सांगितले.त्या वयातच राग हा मोठा शत्रू असल्याची जाणीव झाली, असे जलोटा नमूद करतात. “चूक दुसऱ्याची असताना आपण का रागवायचं? संत, कवी, महान गायकांचे गुण मनात रुजले म्हणून मी रागावर नियंत्रण ठेवू शकलो,” असे ते म्हणाले. ‘भोर भयो...’ हे भजन गात त्यांनी शास्त्रीय संगीताच्या रागदारीची सौंदर्यपूर्ण ओळखही करून दिली.
कलाकाराने Anup Jalota आपली कला लोकसेवेसाठीही अर्पण करावी, असे मत ते मनापासून जपत आले आहेत. “कला व्यवसायाबरोबरच समाजकार्यासाठीही असावी. ‘खजाना’ फेस्टिव्हलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना मदत केली जाते. संगीत देवी सरस्वतीचे काम असल्याने लोकांकडून नेहमीच प्रेम आणि सहकार्य मिळतं,” असे त्यांनी सांगितले.दिवंगत गझलसम्राट पंकज उदास सोबतच्या नात्याबद्दल ते म्हणाले, “आमच्यात स्पर्धा होती, पण ती प्रेमाची होती. कधीकधी त्यांच्या चाहत्यांनाही मी ऑटोग्राफ द्यायचो. आम्ही एकमेकांच्या कलेचा सन्मान करणारे होतो.” ‘चिठ्ठी आयी है’ या गाण्याच्या आठवणींनी त्यांनी पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आपला आवाज ताजातवाना ठेवण्यामागील रहस्य उलगडताना अनुप जलोटा म्हणाले, “मी आयुष्यात कधीच धूम्रपान केलं नाही. सिगारेट स्टॅमिना आणि आवाजाची गुणवत्ता खराब करते. तंबाखू आणि गुटखा आवाजाचा सुर बदलतात. सकाळी रियाज, जलनेती, योगा, प्राणायाम करतो. संयम आणि शिस्त या माझ्या जीवनशैलीच्या दोन मोठ्या किल्ल्या आहेत.”AI बद्दल बोलताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची दखल घेतली, मात्र भावनांच्या अभावाकडेही लक्ष वेधलं. “AI ही मोठी संधी आहे. अनेक तासांचं काम काही मिनिटांत होतं. तुम्ही सांगाल त्या गायकाच्या आवाजात गाणंही बनतं. पण भावना? त्या मशीनकडे नसतात. तंत्रज्ञान हृदय देऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.मनोरंजन विश्वातील चर्चित शोबाबत बोलताना ते म्हणाले, “आजही मला बोलावलं तर मी सहभागी होईल. तो एक वेगळाच अनुभव होता. जसलीन मथारू सोबत माझं नाव जोडण्यात आलं, पण ते फक्त टीआरपीसाठी होतं. माझ्या प्रतिमेला त्याचा काहीच फरक पडला नाही.”अनुप जलोटा यांच्या या संवादातून त्यांच्या आयुष्याचा सूर, साधनेची ताकद, संगीतावरील श्रद्धा आणि जगण्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक स्पष्ट झालाएक असा कलाकार जो वयापेक्षा तरुण, मनाने शांत आणि कलेशी निखळ निष्ठा जपणारा आहे.