आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोंधळ’ची दणदणीत कामगिरी

मराठी चित्रपटाला पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा सिल्व्हर पिकॅाक पुरस्कार

    दिनांक :30-Nov-2025
Total Views |
गोवा,
Gondhal Marathi film, मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जीवनशैलीच्या छटा रेखाटणारा ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. गोव्यात संपन्न झालेल्या भारतीय सरकारच्या 56व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक – इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावत मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान वाढवला. विशेष म्हणजे या 56 वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला मिळाला आहे.
 

Gondhal Marathi film, 
यंदा इफ्फीमध्ये तब्बल 1130 चित्रपटांची नोंदणी झाली होती, त्यापैकी 570 फिचर फिल्म्स होत्या. या तीव्र स्पर्धेत ‘गोंधळ’ने आपली ताकद सिद्ध करत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला. या पुरस्कारामध्ये पंधरा लाख रुपये रोख रक्कम आणि मानांकनाचा समावेश आहे.
 
 
पुरस्कार सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, ऋषभ शेट्टी, रणबीर सिंग, नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
2019 मध्ये ‘जल्लीकट्टू’चे दिग्दर्शक लिजो जोस यांनी हा सन्मान मिळवला होता. त्यानंतर प्रथमच भारतीय चित्रपटाला पुन्हा हा अवॉर्ड मिळाला असून, मराठी चित्रपटासाठी हा पहिलाच विजय ठरला आहे. त्यामुळे हा क्षण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाचा असून, आंतरराष्ट्रीय विभागात विजेतेपद मिळवणारा ‘गोंधळ’ हा यंदाचा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण असून, पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून गौरवण्यात आले आहे. डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट मराठी मातीत रुजलेल्या लोकपरंपरा, श्रद्धा आणि मानवी भावविश्वाचं प्रभावी चित्रण करतो. नवरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी कथा धार्मिक परंपरेपलीकडे जाऊन अंधश्रद्धा, कौटुंबिक संघर्ष, सामाजिक बदल आणि मानवी मनातील रहस्याचा शोध घेते.सिनेमॅटोग्राफी, तांत्रिक बांधणी आणि भव्य सादरीकरणामुळे ‘गोंधळ’ जागतिक पातळीवरही मराठी संस्कृतीचं सामर्थ्य ठसवतो. आपल्या भावनांना शब्द देताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात मिळालेला हा सन्मान आमच्या मेहनतीचा मोठा गौरव आहे. ‘गोंधळ’ म्हणजे आपल्या मातीशी, संस्कृतीशी असलेले नातं. जागतिक प्रमाणीकरण मिळणं ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे आहेत, तर डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. चित्रपटाला मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.