नागपूर,
grand-bike-rally-in-north-nagpur : हिंद की चादर श्री गुरू तेगबहादूरसिंग साहिब यांच्या शहिदी समागम समारोहानिमित्त राज्यस्तरीय समितीच्या वतीने बाबा बुधाजीनगरातील खालसा गुरूद्वारापासून आज बाईक रॅली काढण्यात आली. शेकडोंच्या संख्येत भाविकांनी भाग घेऊन गुरू तेगबहादूर यांच्या बलिदानाला अभिवादन करीत त्यांच्या बलिदान, मानवता, धार्मिक स्वातंत्र्य, एकता व बंधुभावाचा संदेश दिला.
हिंद की चादर गुरू तेगबहादूरसिंग यांचे योगदान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी 7 डिसेंबरला नारामधील कुकरेजा मैदानात विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 लाख शिख बांधव व इतर नागरिक एकत्र जमणार आहेत. महाराष्ट्र शासन व हिंद की चादर श्री गुरू तेगबहादूर 350 व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीचे विदर्भ क्षेत्राचे अध्यक्ष सरदार गुरमितसिंग खोक्कर यांनी झेंडी दाखविली. याप्रसंगी समागम समन्वयक रामेश्वर नाईक, धर्मजागरणचे महेंद्र रायचुरा, सुनील भुलगावकर, गुरूद्वारा प्रधान सुखविंदरसिंग पाल, मलकियतसिंग बल, गुरूदयालसिंग पड्डा यांच्यासह इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
रॅली ऑटोमोटिव्ह चौक, कामगारनगर चौक, गुरूद्वारा श्री गुरू हरगोविंदसिंग साहिब, गुरूद्वारा भाई मतीदास गुरूद्वारा शहिद दीपसिंग, पॉवर ग्रीड चौक, तथागत चौक, लाल गोदाम, गुरूद्वारा श्री कलगीधर दरबार बुद्धनगर, गुरूद्वारा गुरूनानक दरबार गुरमीत खोकर, 10नंबर पूल, गुरूद्वारा सिंग सभा कामठी रोड, पाटणी ऑटोमोबाईल, माऊंट रोड, सदर, छावणी चौक, गोंडवाना चौक, इटारसी पूल, जिंजर मॉल, भीम चौक, जरीपटकामध्ये पोहचली.
ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करीत रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कुकरेजा मैदानात रॅलीचे समारोप झाला.
रॅलीसाठी प्रीतपालसिंग भाटिया, परमजितसिंग भट्टी, गजेंद्रसिंग लोहिया, गुरू बावरा, गुरू प्रतापसिंग, देवेंदरसिंग ढिल्लोे व अनेकांनी सहकार्य केले. महानगरपालिकेद्वारा एम ए के आझाद इंग्लिश उर्दू माध्यमिक शाळा व दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली.