कॅनडाचा भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका!

04 Nov 2025 12:50:40
ओटावा,
Canada's shock to Indian students कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका दिला आहे. परदेशात शिक्षण घेण्याचं आणि स्थायिक होण्याचे भारतीय युवकांचे स्वप्न आता धूसर होत चाललं आहे. कारण, कॅनडाच्या सरकारकडून ७४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज सरळ नाकारण्यात आले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात भारतातून आलेल्या बहुतेक स्टडी परमिट अर्जांना मंजुरी मिळाली नाही, तर चीनमधील फक्त २४ टक्के अर्जांना नकार देण्यात आला. या आकड्यांवरून कॅनडाने भारतावरील व्हिसा धोरण अधिक कठोर केल्याचे स्पष्ट होते.
 
 
Canada
 
कॅनडामधील विद्यार्थी व्हिसांवरील निर्बंध गेल्या काही महिन्यांपासून अधिक कडक करण्यात आले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीवर आणि तात्पुरत्या स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं कॅनडाच्या सरकारचं म्हणणं आहे. पण त्याचा सर्वाधिक परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर होत आहे. कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाच्या अहवालानुसार, एकूण अभ्यास परवान्यांपैकी जवळपास ४० टक्के अर्ज नाकारले गेले आहेत. एवढेच नव्हे तर, देशात राहणाऱ्या महिला विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठीही सरकारने विशेष तपास मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
दरम्यान, भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. २०२३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत भारताच्या सहभागाचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक वितंड निर्माण झाले. याच काळात कॅनडाने १,५०० पेक्षा अधिक बनावट स्टडी व्हिसा प्रकरणे उघडकीस आणल्याचा दावा केला होता, ज्यातील बहुतांश अर्ज भारताशी संबंधित होते. त्यानंतरपासून भारतीय विद्यार्थ्यांविषयी संशय वाढला आणि व्हिसा धोरण अधिक कठोर करण्यात आले.
 
परिणामी, कॅनडामध्ये शिक्षण घेण्याचा उत्साह भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीयरीत्या घटला आहे. २०२३ मध्ये जवळपास २१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, पण २०२५ मध्ये ही संख्या केवळ साडेचार हजारांवर घसरली आहे. भारतीय तज्ज्ञांच्या मते, कॅनडाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे तर दोन्ही देशांतील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0