मंगरूळनाथ,
Construction of a new court building येथे न्यायालयाची नवीन इमारत मंजूर झाली आहे. त्या अनुषंगाने विधीज्ञ मंडळांची ३ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यात आली. या सभेत मंगरूळनाथ न्यायालयाचे नवीन इमारतीचे बांधकामाची निविदा, तसेच भूमीपूजन लवकरात लवकर करण्याचा ठराव सवार्नुमते पारित करून तशा आशयाचे निवेदन जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ मंगरूळनाथ यांच्यामार्फत प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांना देण्यात आले. सदर मागणी निकाली न निघाल्यास कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंगरुळनाथ विधिज्ञ मंडळाच्या वतीने देण्यात आला.

मंगरूळनाथ येथे झालेल्या विधीज्ञ मंडळाच्या सभेत न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामास विलंब होते आहे. त्यामुळे सर्व विधीज्ञ यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत आपणाकडे मागील सहा महिन्यांपासून पत्र व्यवहार करून देखील आजपर्यंत कोणतीही तातडीची कार्यवाही केली नाही. त्यामुळे उपलब्ध मंजूर निधीत बांधकामाबाबत निविदा काढून नवीन इमारतीचे भूमीपूजन समारंभ तातडीने घेण्यात यावे व अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यासाठी शासनाला योग्य तो प्रस्ताव पाठविण्यात यावा, जेणे करून इमारतीचे काम तातडीने सुरु होईल. तरी १५ नोव्हेंबरपर्यंत आमची मागणी लेखी स्वरूपात मंजूर करावी, अन्यथा १७ नोव्हेंबरपासून विधीज्ञ मंडळ, मंगरूळनाथ न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलन करतील, असा सवार्नुमते ठराव पारीत करण्यात आला आहे. यावेळी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजश्वर एस. पांडे, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद बोलके, सचिव अॅड. वैभव बेलोकर, कोषाध्यक्ष अॅड. आशिष मुळे यांच्यासह विधिज्ञ मंडळाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.