नवी दिल्ली,
drug-related-deaths : मादकपदार्थांच्या ओव्हरडोजमुळे देशभरात दररोज अनेकांचा जीव जात असल्याचा अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केला आहे. या अहवलात 2019 ते 2023 दरम्यान ड्रग्ज ओव्हरडोजमुळे मृत्यू झालेल्यांची माहिती देण्यात आली. दर आठवड्याला 12 लोकांचा मृत्यू हा ओव्हरडोजमुळे होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
एनसीआरबीनुसार, 2023 मध्ये मादकपदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे दर आठवड्याला 12 लोकांचा मृत्यू होत होता. 2019 ते 2023 दरम्यान, दररोज दोन मृत्यू मादकपदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे होत होते. या अहवालात केवळ मादकपदार्थांच्या ओव्हरडोसमुळे झालेल्या मृत्यूंची पुष्टी केलेल्या माहितीचा समावेश आहे. मादकपदार्थांच्या ओव्हरडोसची अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत आणि या प्रकरणांची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समाविष्ट केलेली नाही.
सुरुवातीच्या आकडेवारीत मादकपदार्थांच्या अतिरिक्त मात्रेमुळे तामिळनाडूत मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वांत जास्त होते. परंतु, आता राज्यात प्रकरणे कमी आहेत. 2019 मध्ये, तामिळनाडूमध्ये मादपदार्थांच्या अतिरिक्त मात्रेमुळे 108 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, 2023 मध्ये हा आकडा 65 पर्यंत घसरला. 2019 मध्ये पंजाबचा समावेश पहिल्या पाचमध्ये नव्हता. 2022 मध्ये पंजाबमध्ये मादकपदार्थांच्या अतिरिक्त मात्रेमुळे 144 लोकांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये, हा आकडा 89 पर्यंत घसरला.
मादकपदार्थांच्या अतिरिक्त मात्रेमुळे झालेल्या मृत्यूची संख्या
वर्ष - मृत्यूचा आकडा
2019 - 704
2020 - 514
2021 - 737
2022 - 681
2023 - 654