वाघाची भ्रमंती, रात्री सर्वत्र अंधार, मग आम्ही सुरक्षित कसे असणार?

04 Nov 2025 16:31:22
तभा वृत्तसेवा
झरीजामणी, 
tiger-wandering : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या सततच्या हालचालीमुळे ग्रामीण भागात प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि पशूपालक यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. सध्या कापूसवेचणी, तूर पिकाचे संगोपन आणि इतर हंगामी शेतीकामे सुरू असताना वाघाच्या दहशतीमुळे ही कामे अडचणीत आली आहेत. अनेक शेतकरी आणि मजूरवर्ग शेतात जाण्यास कचरू लागले आहेत.
 

YTL 
 
शेतकरी सांगतात की, दिवसाही वाघ शेतांच्या कडेने फिरताना दिसतो. त्यामुळे शेतात एकटे जाणे म्हणजे जीवाशी खेळणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी व मजूर वर्गाने रात्री शेतात जागलीसाठी नकार दिला आहे. काही गावांमध्ये लोक गटागटाने शेतात जातात, तरीही त्यांच्या मनात सतत भीती असते.
 
 
तालुक्यातील अर्धवन, मार्की, मुकुटबन, अडकोली, पवनार, अडेगाव आणि इतर गावांत वाघाच्या हालचाली मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. नुकतेच मुकुटबन परिसरात एका बैलावर वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली. त्यामुळे पशूधनासह माणसांच्याही जीवित्वास धोका निर्माण झाला आहे.
 
 
अनेक शेतकèयांनी शेतात मजुरांच्या राहण्यासाठी झोपड्या किंवा तंबू उभारले आहेत, मात्र रात्री वीजपुरवठा नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. सिंगल फेस वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजूरवर्ग रात्री घराबाहेर पडण्यास घाबरतो.
 
 
आतातरी याकडे वीज विभागाने याकडे त्वरित लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांतून जोर धरत आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता वाघाच्या भीतीमुळे त्यांचे बेहाल झाले आहे. काही ठिकाणी बाहेरील प्रांतातून मजूर आणावे लागत आहेत. त्यामुळे अतिरिक्त खर्च वाढतो. परंतु आता वाघाच्या दहशतीमुळे ते मजूरही परत जात आहेत. आम्ही पिके उभी केली, पण आता ती काढायला कोणी तयार नाही, असे शेतकरी सांगतात.
 
 
वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी आणि मानववस्तीपासून दूर हलवण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि ग्रामस्थांना सतर्क ठेवावे, अशी मागणी होत आहे. तालुक्यात वाघाच्या भीतीमुळे निर्माण झालेल्या या असुरक्षित वातावरणामुळे शेतकरी व मजूर वर्ग चिंतेत आहे. शासन, वनविभाग आणि वीज वितरणने एकत्रित कारवाई करून शेतकèयांना भयमुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0