प्रयागराज,
Establishment of Sanatani Kinnar Akhara प्रयागराजच्या पवित्र संगम नगरीत बुधवारी एक महत्त्वपूर्ण धार्मिक घटना घडली. किन्नर समाजाच्या धार्मिक परंपरेत नवा अध्याय लिहित, सनातनी किन्नर आखाडा या नव्या आखाड्याची अधिकृत स्थापना करण्यात आली. या आखाड्याचे नेतृत्व प्रसिद्ध धार्मिक व्यक्तिमत्त्व स्वामी कौशल्या नंद गिरी उर्फ ‘टीना माँ’ यांनी स्वीकारले असून, त्यांना आचार्य महामंडलेश्वर म्हणून अभिषेक करण्यात आला. या नव्या आखाड्याची स्थापना मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी उर्फ यमाई ममता नंद गिरी यांच्या नियुक्तीनंतर किन्नर आखाड्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत केलेल्या विधानामुळे विद्यमान आखाड्यात मतभेद निर्माण झाले. या वादातून अखेर टीना माँ आणि त्यांच्या समर्थकांनी वेगळा सनातनी किन्नर आखाडा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सोहळ्याची सुरुवात त्रिवेणी संगमावर विधीवत स्नान आणि वैदिक मंत्रोच्चारांसह करण्यात आली. त्यानंतर बैरहान येथील दुर्गा पूजा पार्कमध्ये वैदिक ब्राह्मणांच्या उपस्थितीत अभिषेक समारंभ पार पडला. अभिषेकानंतर काशीतील डमरू वादकांच्या तालावर आरती करण्यात आली, तर देशभरातून आलेल्या किन्नर बांधवांनी नृत्य आणि भजनांद्वारे आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, कामाख्या पीठाधीश्वर भवानी माँ यांनीही या नव्या आखाड्याला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, किन्नर आखाडा पूर्वी पंच दशनाम जुना आखाड्याशी संलग्न होता आणि पुढेही ते महंत हरी गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राहतील. तसेच अयोध्या, कानपूर, मिर्झापूर, वाराणसी आणि प्रतापगडसह अनेक शहरांतून आलेल्या किन्नर साध्वींनी या प्रसंगी उपस्थित राहून टीना माँ यांना आशीर्वाद दिले.