फिलीपिन्समध्ये वादळ बचाव मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले

04 Nov 2025 21:40:35
मनिला, 
helicopter-crashes-in-philippines फिलिपिन्समध्ये घोंगावत असलेल्या ‘कालमेगी’ या भीषण चक्रीवादळाने आधीच मोठे  विध्वंस माजवला असतानाच आता देशाच्या दक्षिण भागातून आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी निघालेलं फिलिपिन्स वायुदलाचे हेलिकॉप्टर सोमवारी अगुसन डेल सुर प्रांतातील लोरेटो शहराजवळ कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पाच सैनिक सवार होते आणि सध्या त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती फिलिपिन्स सैन्याच्या ईस्टर्न मिंडानाओ कमांडने दिली आहे.
 
helicopter-crashes-in-philippines
 
‘सुपर ह्युए’ प्रकारचं हे हेलिकॉप्टर ‘कालमेगी’ चक्रीवादळाने उद्ध्वस्त केलेल्या भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी रवाना झाले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला आणि काही क्षणांतच ते कोसळल्याची माहिती  समोर आली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून स्थानिक प्रशासन आणि वायुदलाचे अधिकारी शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान, ‘कालमेगी’ चक्रीवादळामुळे फिलिपिन्समध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृतरीत्या समोर आली आहे. helicopter-crashes-in-philippines अनेक प्रांतांमध्ये प्रचंड पूर आला असून काही ठिकाणी नागरिक छतांवर अडकले आहेत. ग्वेन्डोलिन पॅंग, फिलिपिन्स रेड क्रॉसच्या महासचिवांनी सांगितलं की, “सेबूच्या किनारी भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. घरे, गाड्या पाण्यात वाहून गेल्या असून मदतकार्य थांबले आहे.”
 सौजन्य : सोशल मीडिया
‘कालमेगी’ हे यावर्षीचे फिलिपिन्सला तडाखा देणारे २०वे  चक्रीवादळ असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. प्रचंड वादळी वाऱ्यासह समुद्रात तीन मीटरपर्यंत उंच लाटा उसळत आहेत. helicopter-crashes-in-philippines आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वीच १.५ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मंगळवारी उशिरा रात्री किंवा बुधवारी पहाटे ‘कालमेगी’ पश्चिमेकडील पलावन प्रांत ओलांडून दक्षिण चीन समुद्राकडे सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, तोपर्यंत देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसासह बचावकार्य सुरूच राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0