पाटणा,
Himanta Biswa Sarma's statement बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी सिवान जिल्ह्यातील सभेत एक विधान करत राजकीय वातावरण तापवले आहे. राजद उमेदवार ओसामा शहाब यांचे नाव थेट न घेताही त्यांनी त्यांची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी करत तीव्र टीका केली. सर्मा म्हणाले, हा देश भगवान राम आणि माता सीतेचा आहे, लादेनचा नाही. देशातील प्रत्येक ‘ओसामाला’ लोकशाही मार्गाने संपवणे गरजेचे आहे.

सभेच्या सुरुवातीला आपल्या खास शैलीत बोलताना त्यांनी सांगितले, माझी हिंदी कदाचित परिपूर्ण नसेल, पण माझं मन देशभक्तीने भरलेलं आहे. आसाम माता कामाख्येची भूमी आहे, आणि तिचं आशीर्वाद इथेही लाभो हीच इच्छा. रघुनाथपूर ही पवित्र भूमी आहे, कारण ती भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कार्याशी जोडलेली आहे. यानंतर ते पुढे म्हणाले, पक्षाने मला इथे पाठवलं, मला वाटलं मी राम आणि सीतेची भक्त मंडळी भेटेल, पण लोकांनी सांगितलं की इथे ओसामा नावाचाही एक आहे. मी विचारलं ओसामा बिन लादेन तर संपला, हा कोण नवीन? लोक म्हणाले, हा त्याचाच छोटा अवतार आहे. मग मी म्हणालो, अशा ‘ओसामांना’ या निवडणुकीत जनता मतपेटीतून हरवून दाखवा.
आपल्या भाषणात त्यांनी दिवंगत राजद नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचाही उल्लेख केला. सर्मा म्हणाले, त्याच्या वडिलांच्या नावावर गुन्ह्यांचा डोंगर आहे. जर ही परंपरा थांबवली नाही तर हिंसाचार आणि दहशतवादाची बीजे पुन्हा रुजतील. ते पुढे म्हणाले की, घुसखोरांना या देशात मतदानाचा अधिकार असू शकत नाही. राहुल गांधी अशा लोकांसाठी मोहीम करतात, पण बिहारच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. देशात जेव्हा हिंदू समाज जागृत होईल, तेव्हा कोणताही ओसामा किंवा औरंगजेब त्यांच्या वाटेत उभा राहू शकणार नाही. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी सर्मांवर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप केला आहे. तथापि, सर्मा यांच्या भाषणाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.