प्योंगयांग,
Kim Yong Nam passes away उत्तर कोरियातील दीर्घकाळ देशाची सूत्रे हाताळणारे आणि किम राजघराण्याचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेते किम योंग नाम यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्था कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिली आहे. किम योंग नाम यांनी सुमारे दोन दशके उत्तर कोरियाचे औपचारिक राष्ट्रप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांचा मृत्यू अनेक अवयव निकामी झाल्याने सोमवारी झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना शोकसंवेदना व्यक्त करत देशासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. किम योंग नाम यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम गुरुवारी पार पडणार आहे. किम योंग नाम हे सत्तारूढ किम कुटुंबातील सदस्य नसले तरी त्यांनी या राजवंशाशी अखंड निष्ठा राखली होती. १९९८ साली त्यांची सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या प्रेसिडियमचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यांनी हे पद एप्रिल २०१९ पर्यंत सांभाळले. या पदाला देशातील "औपचारिक राष्ट्रप्रमुख" मानले जाते, परंतु खऱ्या अर्थाने सत्ता किम कुटुंबाकडेच केंद्रित आहे.
१९४८ मध्ये स्थापन झालेल्या उत्तर कोरियामध्ये किम इल सुंग, किम जोंग इल आणि नंतर किम जोंग उन या तीन पिढ्यांनी देशावर हुकूमशाही पद्धतीने राज्य केले. या तिन्ही काळात किम योंग नाम हे राजकीय प्रणालीतील विश्वासार्ह स्तंभ मानले जात होते. किम योंग नाम यांच्या निधनाने उत्तर कोरियाच्या राजकीय व्यवस्थेतील एक जुना आणि अनुभवी अध्याय संपुष्टात आला आहे.