मुंबई,
ladki-bahin-scheme राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी केली असून, या घोषणेनंतर राज्यातील तब्बल २८८ निमशहरांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेलाही तात्पुरता ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून काही लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्याने पुढील हप्त्यांचे वितरण थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर आचारसंहितेमुळे ही योजना रोखली गेली, तर पुढील निधीचे वाटप जानेवारी २०२६ नंतरच होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. ‘लाडकी बहीण’ योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. ladki-bahin-scheme विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचा शुभारंभ झाला होता. मात्र, नोव्हेंबर २०२४ मधील निवडणुकांपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने सरकारला ही योजना काही काळासाठी स्थगित करावी लागली होती. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये महिलांच्या खात्यात पुन्हा हप्ता जमा करण्यात आला होता.
आता नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही तोच नियम लागू होण्याची शक्यता आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल (३ नोव्हेंबर २०२५) ट्विटरवरून जाहीर केले होते की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील तीन दिवसांत जमा केला जाईल. मात्र, दुसऱ्याच दिवशी राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्याने संपूर्ण प्रक्रियेवर आचारसंहितेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या राज्य सरकारकडून या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, सरकार लवकरच या विषयावर भूमिका स्पष्ट करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.