अट्टल घरफोड्यांवर एलसीबीचा दणका

04 Nov 2025 21:31:29
वर्धा, 
wardha-news अट्टल घरफोडी करणार्‍या दोघांना अटक करून ३ घरफोडी व एक चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
wardha-news
 
गजानननगरी येथील सूरज राठोड हे २५ ऑटोबर रोजी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराच्या मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सावंगी पोलिस ठाण्यात देण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने शोधकार्याला गती दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यात आला. यादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपी निष्पन्न करण्यात आले. wardha-news सदर आरोपींनी ४ महिन्यांपूर्वी सेवाग्राम, वर्धा, रामनगर परिसरात घरफोडीचे गुन्हे केले असल्याने त्यांना अटक करण्यात आली होते. ४ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला सदर आरोपी हे विक्रमशिलानगर परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने आरोपींचा शोध घेतला. आरोपी विक्रमशिलानगर येथे मित्राकडे आढळून आले.
 
आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुदर्शन वाडेकर (२३) रा. सर्कस ग्राउंड रामनगर, ओम नवले (१९) रा. विक्रमशिलानगर असे नाव सांगितले. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगाही होता. चोरीच्या गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता सावंगी मेघे हद्दीतील गणेशनगरी व रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील जोशी लेआउट, पोलिस स्टेशन देवळी हद्दीमधील महालक्ष्मी टाऊन येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांसह १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चोरट्यांना अटक करण्यात आली. wardha-news पुढील तपास सावंगी पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, विकास मुंढे, सुगम चोधरी, शुभम राऊत, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे, राहुल अथवाल, दिनेश बोरकर, अक्षय राऊत यांनी केली.
Powered By Sangraha 9.0