हादरवणारी माहिती...पुण्यात चार तालुक्यात १२०० बिबट्यांचा मुक्तसंचार

04 Nov 2025 11:45:58
पुणे,
Leopards roam freely in Pune पुणे जिल्ह्यात सध्या एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या चार तालुक्यांमध्ये तब्बल १२०० हून अधिक बिबटे मुक्तसंचार करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची उपस्थिती महाराष्ट्रात अन्यत्र कुठेच आढळत नाही. शेतात, माळरानावर, नदीकिनारी, गोठ्याजवळ आणि अगदी रस्त्यांवरही बिबटे सहज दिसतात. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलीकडेच शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे १३ वर्षीय मुलगा रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे–नाशिक महामार्ग अडवून धरला होता. गेल्या काही महिन्यांतच जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर भागात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे १२ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ आमनेसामने आले आहेत.
 
 

Leopards roam freely in Pune 
पिंपरखेडमध्ये एका बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडले, पण त्याला ठार मारण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांचा संताप ओसंडून वाहत असून, “जेरबंद बिबटा ठार करा” अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, जेरबंद झालेला बिबट्या कायदेशीरदृष्ट्या ठार करता येत नाही, फक्त मुक्त असलेल्यालाच ठार करण्यास परवानगी असते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या सर्व घटनांमागे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या चार तालुक्यांमध्ये एवढे बिबटे आले तरी कुठून? तज्ज्ञ सांगतात की, ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही, तर गेल्या काही वर्षांपासूनच्या पर्यावरणीय आणि मानवनिर्मित कारणांचा तो परिणाम आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आहे. घनदाट उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांना आश्रय, प्रजननासाठी जागा आणि शिकार दोन्ही मिळतात. त्यामुळे हे भाग बिबट्यांसाठी अत्यंत सुरक्षित ठरतात. एका चौरस शंभर किलोमीटरमध्ये सहा ते सात बिबटे आढळतात. ही घनता देशातील काही अभयारण्यांपेक्षाही जास्त आहे.
 
तसेच पश्चिम घाटातील जंगलांमधील जैवविविधतेचा ऱ्हास, जंगली शिकार प्राण्यांची संख्या कमी होणं, आणि मानवी वस्तीचा सतत वाढता विस्तार यामुळे बिबटे मानवी परिसराकडे आकर्षित झाले आहेत. ते आता गावांजवळील कुत्रे, गुरं आणि कचरा यांवरही जगतात. याशिवाय सिंचन प्रकल्पांमुळे या भागात वर्षभर पाण्याची उपलब्धता राहते, त्यामुळे बिबट्यांना जगण्यासाठी अनुकूल वातावरण मिळतं. वाघासारखे प्रमुख शिकारी प्राणी नसल्याने बिबट्यांना कोणताही धोका नसतो, आणि त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. प्रत्येक मादी बिबटी दरवेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देते आणि त्यापैकी बहुतांश जगतात, त्यामुळे त्यांची लोकसंख्या दुप्पट गतीने वाढत आहे.
 
या सर्व कारणांमुळे मानव–बिबट्या संघर्ष तीव्र स्वरूपात वाढला आहे. उन्हाळ्यात पाणी व शिकार कमी झाल्यावर बिबटे अधिक प्रमाणात मानवी वस्तीजवळ येतात. परिणामी, भीती, हल्ले आणि आक्रोश सतत वाढत आहेत. वनविभागाने परिस्थिती हाताळण्यासाठी पिंजरे लावणे, नरभक्षक बिबटे पकडणे, त्यांचे निर्बीजीकरण आणि जनजागृती मोहिमा राबवणे अशा विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. तरीही ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना कायम आहे. एकूणच, पुण्यातील चार तालुके आज “बिबट्यांच्या सावटाखाली” आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक पाऊल आता धोक्याचे बनले आहे.
Powered By Sangraha 9.0