महाराष्ट्रात आचारसंहिता लागू...२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

04 Nov 2025 16:31:35
 मुंबई,
Maharashtra Local Body Elections राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून, यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणीचा दिवस ३ डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे. यासोबतच, आज म्हणजेच ४ नोव्हेंबरपासून राज्यभर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
 
 
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो 
 
राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानिक संस्थांचा कार्यकाळ संपलेला असल्याने या निवडणुका अत्यंत निर्णायक मानल्या जात आहेत. सध्या राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची मुदत पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी पार पडेल, तर माघारी घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत असेल. निवडणुकीसाठी चिन्हवाटपाचा दिवस २६ नोव्हेंबर ठरविण्यात आला आहे. या निवडणुकीत एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपला हक्क बजावतील. त्यापैकी ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार असतील. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी राज्यभरात सुमारे १३ हजार कंट्रोल युनिट्स उभारण्यात आली आहेत.
 
निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ३२ विशेष जनजागृती मोहिमा आखल्या आहेत. विशेषतः महिलांसाठी ‘गुलाबी मतदान केंद्रे’ उभारण्यात येणार असून, येथे सर्व अधिकारी महिला असतील. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना प्राधान्याने मतदान करण्याची संधी मिळणार आहे. विभागनिहाय निवडणुका होणार असून यात कोकण विभागात १७, नाशिक विभागात ४९, पुणे विभागात ६०, संभाजीनगर विभागात ५२, अमरावती विभागात ४५ आणि नागपूर विभागात ५५ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. राज्याच्या राजकारणात या निवडणुका आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीचा "सेमी फायनल" मानल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचारयुद्धाचे रणशिंग फुंकले असून, पुढील काही दिवसांत स्थानिक राजकारण तापणार हे निश्चित आहे.
Powered By Sangraha 9.0