अंकारा,
Muhammad Yunus India Map बांगलादेशातील अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी वातावरण निर्माण केल्याचा आरोप होत आहे. नुकतेच त्यांनी तुर्कीच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाला एक कलाकृती भेट दिली, ज्यात भारताच्या ईशान्य प्रदेशाचा भाग बांगलादेशात दाखवण्यात आला आहे. या कृतीने भारतातील राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच युनूस यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अशीच कलाकृती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आता तुर्कीला सादर केलेल्या या ‘आर्ट ऑफ ट्रायम्फ’मुळे बांगलादेशच्या राजकीय हेतूंविषयी शंका व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा नकाशा फक्त एक कलात्मक प्रतीक नसून, तो इस्लामिक राष्ट्रांना दिलेला एक सूचक संदेश असल्याचे मानले जात आहे. युनूस यांच्या भेटीवेळी तुर्की प्रतिनिधींना भारताशी झालेल्या १९७१ च्या युद्धाशी संबंधित काही संवेदनशील दस्तऐवजही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात भारताशी झालेल्या संघर्षाच्या तपशीलवार नोंदी आणि त्या काळातील रणनीतीविषयी माहिती असल्याचे म्हटले जाते.
भारत सरकार या घडामोडींकडे गांभीर्याने पाहत असून, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संबंधित संस्थांकडून अहवाल मागवला आहे. दिल्लीतील सूत्रांच्या मते, बांगलादेशाच्या तात्पुरत्या सरकारचा हा पाऊल प्रदेशातील स्थैर्यासाठी घातक ठरू शकतो. दरम्यान, तुर्कीने गेल्या काही महिन्यांत दक्षिण आशियात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, ड्रोन तंत्रज्ञानाचे आदानप्रदान आणि गुंतवणुकीच्या प्रस्तावांद्वारे ते बांगलादेशाशी निकट संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर, मोहम्मद युनूस यांची ताजी हालचाल केवळ सांस्कृतिक आदानप्रदान नसून, प्रादेशिक राजकारणातील नवा दबाव निर्माण करण्याचा भाग असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.