इस्लामाबाद,
Pakistan's Afghan expulsion order पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांमधील सीमारेषा पुन्हा युद्धभूमीसारख्या दिसू लागल्या आहेत. पाकिस्तानने देशात दशकांपासून राहणाऱ्या हजारो अफगाण नागरिकांविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत पोलिस आणि प्रशासन एकत्रितपणे कार्यरत असून, ज्यांच्याकडे वैध कागदपत्रं नाहीत अशा अफगाण नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारने आणखी कठोर पाऊल उचलत आपल्या नागरिकांनाही इशारा दिला आहे. ज्या पाकिस्तानी नागरिकांनी अफगाण लोकांना घरं, दुकाने किंवा रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शाहबाज शरीफ सरकारने स्पष्ट केले आहे. परिणामी, अनेक भागांत अफगाण नागरिकांवर छापे टाकले जात आहेत. अनेकांच्या झोपड्या आणि घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. वीज, पाणी आणि अन्नपुरवठा तोडण्यात आल्याने हजारो लोक रस्त्यावर आले आहेत.

या कारवाईबद्दल तालिबान सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काबूलमधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान आपल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा बदला निरपराध अफगाण नागरिकांकडून घेत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा दावा आहे की हे पाऊल देशातील वाढत्या दहशतवादी धोक्यामुळे आवश्यक झाले आहे. त्यानुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचे कार्यकर्ते अफगाण भूमीवरून पाकिस्तानमध्ये हल्ले करीत आहेत.
अलीकडेच, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काबूल, खोस्त आणि जलालाबादसह पक्तिका प्रांतात हवाई कारवाई केली. या हल्ल्यात अनेक तालिबानी लढवय्ये ठार झाल्याचा दावा इस्लामाबादने केला आहे. त्यात टीटीपीचा नेता नूर वली मेहसूदही ठार झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. अफगाणिस्तानने या कारवाईचा निषेध करत प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्य ठाण्यांवर हल्ले केले. या संघर्षात पाकिस्तानचे काही सैनिक ठार झाल्याचे समजते. ड्युरंड रेषेजवळ गोळीबार, स्फोट आणि प्रत्युत्तरातले हल्ले सुरूच आहेत. या वाढत्या तणावामुळे दोन्ही देशांनी सीमा बंद केल्या आहेत.
कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने काही दिवसांपूर्वी दोहा येथे दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये युद्धबंदी करार झाला होता. त्यानंतर २५ ऑक्टोबरला इस्तंबूलमध्ये पुन्हा बैठक घेऊन युद्धबंदी आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात आली. मात्र, २ आणि ३ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या नव्या हल्ल्यांमुळे परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. पाकिस्तानच्या हवाई कारवाईत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार झाल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धची आगामी मालिका रद्द करत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आता केवळ राजनैतिक नव्हे, तर सामाजिक आणि क्रीडाक्षेत्रातही तुटण्याच्या उंबरठ्यावर आहेत.